
गेला पाच महिन्यांहून अधिकचा काळ महाराष्ट्र कोरोनाविरोधी लढाईत सपाटून मार खात असताना जनतेमध्ये किमान मास्क वापरण्यासंदर्भातील जागृती हे सरकार का निर्माण करू शकलेले नाही. आता काय, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी मोहीम राबविली जाणार आहे. मग इतके दिवस प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी कुणाकडे होती? सरकारवर भिस्त ठेवून कुणीच वागत नव्हते आणि वागू धजणारही नाही.
महाराष्ट्रातील कोरोना महामारी संदर्भातील परिस्थिती किती गंभीर आहे हे समजून घ्यायचे असेल तर जगातील निव्वळ तीनच देशांमध्ये आता महाराष्ट्रापेक्षा अधिक कोविड-19 रुग्ण आहेत हे ध्यानात घेतले पाहिजे. अमेरिका, खुद्द भारत आणि ब्राझिल या तीनच देशांमधील रुग्णसंख्या महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. इतकेच नव्हे तर देशातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधील प्रतिदिन मृत्यूंची सरासरी काढल्यास त्यातही महाराष्ट्रच आघाडीवर आहे. अर्थात अशा कुठल्याही तुलनात्मक आकडेवारीने आपल्या राज्यातील गोंधळलेले महाविकास आघाडी सरकार जागे होईल, अशी शक्यता दिसत नाही. आपण सक्रिय आहोत, असे दाखवण्याकरिता ते निव्वळ गोड-गोंडस नावाच्या योजना जाहीर करतात, वास्तवातील परिस्थितीत मात्र त्याने कुठलाही फरक पडत नाही. आजच्या घडीला मुंबई असो वा पुणे या दोन्ही शहरातील कुठल्याही भागातून फेरफटका मारल्यास निम्म्याहून अधिक लोक विना मास्क हिंडताना दिसतात. मास्क न वापरणार्यांमध्ये जितक्या प्रमाणात गरीब लोक दिसतात तितकेच बेजबाबदार सुखवस्तूही हा मूर्खपणा करताना आढळतात. कित्येक तरुणांमध्ये आपल्याला कोरोनाची काही भीती नाही असा फाजील आत्मविश्वास दिसतो. तुम्हांला भीती नसेल पण तुमच्या घरादारातील, परिसरातील वयस्कांना, गंभीर आजार असणार्यांना तुमच्याकडून मोठा धोका पोहोचू शकेल हे त्यांना कोण समजावणार? पाच महिन्यांच्या काळात लोकांना कोरोना महामारीचे नेमके स्वरूप आपल्याला समजावता आलेले नाही? एक प्रगत, पुरोगामी राज्य म्हणून असलेला महाराष्ट्राचा लौकिक पार धुळीला मिळवण्याचा विडा उचलला आहे का कुणी? वैद्यकीय कारणांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करणार्या गाड्यांना अॅम्ब्युलन्सप्रमाणेच रस्त्यावर पुढे जाऊ दिले पाहिजे, असा साधा निर्णय जाहीर करण्यासाठी आपण इतका काळ आणि इतके बळी का बरे जाऊ दिले? गरीब वस्त्यांमधील अशिक्षित, अर्धशिक्षित लोकांमध्ये कमालीचे गोंधळाचे वातावरण आहे. पाच महिने रोजगाराविना काढलेले येथील लोक पोटापाण्यासाठी बाहेर पडल्यानंतर काहीही करून आता रोजगार मिळवलाच पाहिजे, असा निर्धार तेवढा त्यांच्या ठायी दिसतो. मग कोरोनाविरोधी दक्षता त्यांच्यालेखी गौण ठरल्या तर त्यात आश्चर्य ते काय? रिक्षाचालकांना पूर्वीच्या तुलनेत आज निम्मी मिळकतही होताना दिसत नाही. चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये प्लास्टिकचे कापड लावल्यास प्रवाशांना सुरक्षित वाटेल आणि लोक रिक्षाप्रवासाकडे वळतील. पण हे करायचे कुणी? लोकल रेल्वेसेवा बंद असल्याने दाटीवाटीने बसमधून प्रवास करणे भाग पडणार्या लोकांना आपण सोशल डिस्टन्सिंग पाळा म्हणून उपदेश कसा काय करू शकू. मग कितीही स्वयंसेवक त्यांच्या घरी धाडले तरी त्यांना सोशल डिस्टन्सिंगचा उपदेश पचू शकेल का? जागतिक स्तरावर काही देशांमध्ये नव्याने कोरोना रुग्ण आढळू लागले आहेत. आपल्याकडे तर रुग्णवाढीत खंड असा पडलेलाच नाही. कोरोनाशी युद्ध पुकारल्याच्या बातांचे काय झाले? का, लोकांना तुमची जबाबदारी तुमच्यावरच असे सांगून सरकार आता हात वर करणार आहे?