सुधागडातील नाडसुर ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन; आंदोलन छेडण्याचा इशारा
पाली ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा सुधागड तालुक्यालाही बसला. या वादळाने घरे, गोठे, फळबागा, शेती, दुकानांचे मोठे नुकसान झाले. वादळाला तीन महिने उलटून गेले तरी अद्याप सुधागड तालुक्यातील वादळग्रस्त नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय पंचनाम्याच्या अनुषंगाने मिळालेल्या भरपाईतदेखील तफावत असल्याची तक्रार नाडसुर ग्रामस्थांनी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निसर्गचक्र वादळाचा तडाखा नाडसुर ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावांना बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले, मात्र अधिकार्यांनी चुकीचे पंचनामे केल्याचा आरोप करीत ज्यांचे कमी नुकसान त्यांना अधिक भरपाई, तर ज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यांना कमी भरपाई मिळाली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहिले असून, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवू असे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.
अधिकार्यांनी पंचनामे कोणत्या निकषांच्या आधारे केले असा प्रश्न निर्माण झाला आहे. चुकीच्या पद्धतीने पंचनामे करणार्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नाडसुर ग्रामस्थ व पत्रकार संघाने केली आहे. नुकसानग्रस्तांना योग्य ती भरपाई न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.