Breaking News

आयपीएलचे नवे पर्व

इंंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या पर्वाला शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सलामीच्या लढतीने प्रारंभ झाला. अपेक्षेप्रमाणे हा सामना रंगला आणि यात चेन्नईने मुंबईवर मात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ते स्वीकारून खेळाडूंसह प्रेक्षक क्रिकेटचे नवे स्वरूप अनुभवत आहेत.

जागतिक लोकप्रिय स्पर्धा आयपीएलची तेरावी आवृत्ती संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएईत होत आहे. कोरोनाचा कमीत कमी प्रभाव असल्याने यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दुसर्‍यांदा केले आहे. आयपीएल देशाबाहेर खेळविण्याची ही आजवरची तिसरी वेळ. याआधी लोकसभा निवडणुकीमुळे सन 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेत, तर 2014 साली दुबईत आयपीएलचा सोहळा रंगला होता. यंदाही 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान दुबईमध्ये आयपीएल खेळवली जात आहे. आयपीएलच्या उद्घाटनाचा सामना चार वेळा विजेतेपद मिळवणार्‍या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शनिवारी अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियमवर रंगला. या लढतीत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने रोहित शर्मा कर्णधार असलेल्या मुंबईवर विजय साकारला. या वर्षीची आयपीएल ज्या अनेक कारणांसाठी विशेष आहे त्यापैकी एक म्हणजे महेंद्रसिंह धोनी. भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार राहिलेल्या धोनीने 15 ऑगस्ट रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यापूर्वी तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला होता, पण एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळत होता, मात्र गेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर तो संघातून बाहेर फेकला गेला. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा सातत्याने सुरू होती. अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. असे असले तरी तो आयपीएल खेळणार आहे. कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलली गेली. अगदी यंदा ही स्पर्धा होते की नाही अशीही शंका उपस्थित होत होती. त्यामुळे ‘माही’चे चाहते अस्वस्थ होते. भलेही धोनीला न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकून देता आला नसेल, परंतु असे अनेक अशक्यप्राय विजय त्याने भारताला मिळवून दिले आहेत. 2007चा पहिलावहिला टी-20 विश्वचषक, 2011चा वनडे वर्ल्ड कप आणि 2013मधील चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो एकमेवाद्वितीय कर्णधार आहे. शांत, संयमी व सामना जिंकून देणारा खेळाडू अशी त्याची ओळख राहिलेली आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात त्याला जास्त संधी मिळाली नाही. आता पुढे तो कशी कामगिरी करतोय हे पाहणे रंजक ठरेल. यंदाच्या आयपीएलची आणखी काही वैशिष्ट्ये म्हणजे या वेळी उद्घाटन सोहळा झाला नाही. स्टेडियममध्ये दर्शक नाहीत की जल्लोष करायला चिअर्स लीडर्स नाहीत. एवढेच नव्हे तर खेळाडूंनाही अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा शिरकावा या स्पर्धेत होऊ नये हा यामागचा उद्देश आहे. स्पर्धा पूर्ण होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागणार आहे. दीर्घ काळानंतर क्रिकेटची पर्वणी मिळत असल्याने क्रिकेटप्रेमी खुश आहेत, मात्र टीव्हीवर सामन्यादरम्यान प्रेक्षकांचा रेकॉर्डेड आवाज, चिअर लिडर्सचा डान्स या गोष्टी कृत्रिम वाटतात. त्यावर उपाय शोधला पाहिजे. कोरोनामुळे त्रस्त जीवांची आयपीएलच्या माध्यमातून दोन घटका ताण-तणावविरहीत करमणूक व्हावी हीच माफक अपेक्षा!

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply