Breaking News

नवी मुंबई महापालिकेची बेलापूर-कर्जत बस सेवा

कर्जत : बातमीदार

नोकरी, शिक्षण, उद्योग, व्यवसाय तसेच दैनंदिन कामासाठी कर्जत तालुक्यातील प्रवासी मोठ्या संख्येने नवी मुंबईत जातात, मात्र एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे त्यांची गैरसोय व हाल होत होते. ते लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने बुधवार (दि. 17) पासून बेलापूर-कर्जत अशी बस सेवा सुरु केली आहे.

आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातून एसटीने नव्या मुंबईत जाणार्‍या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. विद्यार्थी व नोकरदार वर्गाला खाजगी गाडीने कर्जत येथून पनवेलला जावे लागत होते. कर्जत-पनवेल एसटी प्रवासासाठी 45 रुपये तिकीट असून खाजगी गाड्या 70-80 रुपये आकारत आहेत. त्याला प्रवासी कंटाळले आहेत. ते लक्षात घेऊन, नवी मुबई महापालिकेच्या परिवहन विभागाने बुधवारपासून आपली परिवहन सेवा कर्जतपर्यंत सुरू केली आहे.

बेलापूर रेल्वे स्टेशनपासून कर्जत रेल्वे स्टेशन या दरम्यान सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू होणारी ही परिवहन सेवा रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. या काळात बेलापूर येथून कर्जतकरिता 14, तर कर्जत येथून बेलापूरसाठी 16 फेर्‍या असणार आहेत, अशी माहिती नवी मुंबई परिवहन सेवेने दिली.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply