Breaking News

सोडे बनविण्याच्या व्यवसायाला तेजी

रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून, येथील समुद्रकिनारी राहणार्‍या कोळी समाजाचा मासळी पकडणे हा मुख्य व्यवसाय आहे. हे लोक यांत्रीक बोटी किंवा छोट्या बोटींमधून समुद्रात जावून मासळी पकडतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोठ्या बोटींने सापडलेली मासळी मोठ्या प्रमाणात मुंबई बंदरात विकली जाते. तर छोट्या बोटींना सापडलेली मासळी कोळी बांधव स्थानिक बाजारात विकतात.

मागील दोन वर्षे मच्छिमारांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. त्यामुळे आर्थिक मिळकत ठप्प होऊन येथील मच्छिमार कर्जबाजारी झाले आहेत. अवकाळी पाऊस, दोन वेळा झालेली चक्रीवादळे, पावसाचे वाढते प्रमाण यामुळे तसेच कोरोना नियमावलीमुळे मुख्य बाजार बंद असणे अशा अनेक कारणामुळे मच्छिमार हैराण झाले होते. आता कोरोना विषयीचे नियम शिथिल करण्यात आले असून, बाजारपेठा पूर्ण वेळ खुल्या झाल्याने व्यापाराला गती मिळत असून, त्याचा फायदा मच्छिमारांनासुद्धा होऊ लागला आहे. पाऊस परतीच्या मार्गावर असून मच्छिमार आता खोल समुद्रात जावून मच्छिमारी करू लागले आहेत. मच्छिमारांना सध्या मुबलक मासळी मिळत असून मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चांगली किंमत मिळू लागली आहे.

सध्या समुद्रात कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग येथील समुद्रात मोठ्या प्रमाणात कोळंबी मिळू लागल्याने मच्छिमार सुखावले आहेत. काही कोळंबी बाजारात विकली जाते तर उर्वरित कोळंबीची साले काढून कडक  उन्हात सुकवून तिचे सोडे बनवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मच्छिमारांच्या गृहिणी कोळंबीची साले काढून ती सुपावर अथवा टोपलीवर अंथरून उन्हात वाळवतात. सुकविलेल्या कोळंबीला सोडे म्हणतात. कोळंबी आठ ते दहा दिवस कडक उन्हात वाळविल्यानंतर तिचे सोडे तयार होतात. सोड्यांना चांगला भाव मिळतो. मुरूड हे पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. येथील सोडे विकत घेतल्याशिवाय कोणताही पर्यटक आपल्या घरी परत जात नाही.

सध्या मुबलक कोळंबी मिळत असल्यामुळे मुरूडमध्ये सोडे बनवण्याच्या व्यवसायाला तेजी आली आहे. त्यामुळे येथील गृहिणींना मोठा स्वयंरोजगार लाभला असून मोठंमोठे व्यापारी अगोदरच संपर्क साधून शंभर ते दीडशे किलोचा माल खरेदीसुद्धा करू लागले आहेत. सध्या मुबलक कोळंबी सापडत असल्याने सोड्यांचा भाव स्थिर आहे, परंतु कोळंबीची आवक घटली की, हाच भाव 1800 ते 2000 हजार रुपये किलो होणार आहे. मुंबई, पुणे भागातील पर्यटकांना सोडे खूप पसंत असून ते मोठ्या प्रमाणावर सोडे विकत घेतात.

 ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरूवात झाली. कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळाल्याने कोळी महिला ऑक्टोबरच्या कडक उन्हात कोळंबी सुकविण्याच्या कामात मग्न झाल्याचे दिसून येत  आहे.

दिवाळी हंगामांत पर्यटक मोठ्या संख्येने मुरूड समुद्रकिनार्‍यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात व जाताना खास वर्षभर पुरेल एवढी ताजी सुकी मासळी खरेदी करतात. त्यामुळे सुक्या मासळीला मागणी वाढते. म्हणून महिला आतापासून सुक्या  मासळीचा साठा करीत आहेत. राजपुरी परिसरातील कोळी महिला सकाळी मुरूड बाजारात मच्छी विकल्यानंतर दुपारच्या वेळेत मासे सुकवण्याचे काम करतात. जागा कमी असल्याने रस्त्याच्या कडेला मासळी सुकवण्याचे काम करावे लागते. दिवाळी हंगामाच्या अगोदर सुकी बनविण्यासाठी ऑक्टोबर  महिन्यातील कडक ऊन त्यांना खूपच फायदेशीर ठरत आहे.

नांदगाव येथील मच्छिमार अमित भोबू यांनी सांगितले की, सध्या कोळंबीची आवक वाढल्याने आमच्या गृहिणी सोडे बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. सुकविण्यासाठी टाकलेल्या कोळंबीचे मांजर, कुत्र, कावळे यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कोळी महिलांना कडक उन्हात जागता पहारा करावा लागतो. सोडे विकल्यावर त्यांच्या मेहनतीचे चीज होत असते.

-संजय करडे, खबरबात

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply