Breaking News

माथेरानच्या मिनीट्रेनचा मार्ग खडतर

नॅरोगेज ट्रॅकवर गवत, माती आणि दगड

कर्जत ः बातमीदार
माथेरान पर्यटनस्थळी जाण्यासाठी मध्य रेल्वेची मिनीट्रेन आणि नेरळ-माथेरान घाटरस्त्याने होणारी वाहतूक दरवर्षी पावसाळ्यात बंद राहून मिनीट्रेनची वाहतूक 15 ऑक्टोबरला पुन्हा सुरू होते, मात्र या वर्षी मिनीट्रेन वेळेत सुरू होण्यात अनेक अडचणी आहेत. मिनीट्रेनच्या मार्गात गवत, माती आणि दगड आल्याने शटल सेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने नॅरोगेज ट्रॅकच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्याची गरज आहे.
यंदा लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक लवकर बंद करावी लागली होती. त्यानंतर स्थानिकांच्या मागणीनंतर मालवाहू गाडी अमन लॉज ते माथेरानदरम्यान चालविली जात होती, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आल्यानंतर मालवाहू सेवाही बंद करण्यात आली होती. दरवर्षी नेरळ-माथेरान मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक मार्गावर पावसाळ्यात दुरुस्तीची कामे करण्यासाठी व परिसर डोंगराळ असल्याने पावसाळ्यात अपघात होऊ नये यासाठी बंद ठेवली जाते. यंदा लॉकडाऊन असल्याने रेल्वेचे कामगार दुरुस्ती कामासाठी फिरकलेही नाहीत. त्यामुळे नॅरोगेज मार्गावर मोठ्या प्रमाणात दगड येऊन अडकून राहिले आहेत. प्रचंड प्रमाणात गवतही वाढले आहे. अपवाद वगळता कुठेही नॅरोगेज ट्रॅक दिसून येत नाही. डोंगरातून येणारी मातीही मार्गात अडकली आहे.
पावसाळा संपल्यावर मिनीट्रेन सेवा 15 ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचा रेल्वेचा शिरस्ता आहे. लॉकडाऊननंतर आता अनलॉक सुरू झाला असून, माथेरानला जाण्यासाठी पर्यटक मिनीट्रेनला सर्वाधिक प्राधान्य देतात. मिनीट्रेनमुळे माथेरानमधील पर्यटन बहरते. त्यामुळे मिनिट्रेनची सेवा सुरू होणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात शटल सेवा सुरू करण्यासाठी माथेरानपर्यंत नेरळ येथून रिकामी गाडी जाणे आवश्यक आहे, पण रेल्वे ट्रॅकची स्थिती लक्षात घेता प्रवासी सेवा सुरू होण्यात अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे माथेरान ते अमन लॉज वगळता संपूर्ण ट्रॅकवर गवत वाढले आहे. दगड-मातीही मोठ्या प्रमाणात साचली आहे. नॅरोगेज मार्गातील हे अडथळे मध्य रेल्वेने दूर करण्याची गरज आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply