सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज व फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम
रोहे : प्रतिनिधी
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने अनेकांचा रोजगार थांबून त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. घरातील कर्त्या माणसाला उत्पन्नाचे साधन न राहिल्याने रोजचा खर्च कसा भागवायचा अशी भ्रांत अनेक महिलांना होती. अशा परिस्थितीत रोह्यातील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज संचालित सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनच्या वतीने फेस मास्क बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आणि सुधा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना जोडून घेत रोजगाराची ही नवी संधी निर्माण करण्यात आली.
‘सुदर्शन’च्या सुधा महिला बचत गटातील सर्व महिला या गृहिणी किंवा रोजंदारीवर काम करणार्या आहेत. रोहा तालुक्यातील धाटाव, वाशी, वरसे आणि जवळच्या गावातील महिलांचा यामध्ये सहभाग आहे. या महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, कापड आणि दोर्याचे रीळ देण्यात येत असून, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करीत या महिलांनी उत्तम दर्जाचे दोन स्तर असलेले मास्क बनवले आहेत. त्यांनी शिवलेले कापडी मास्क बचत गटाच्या माध्यमातून विकले जात आहेत.
आज 100पेक्षा अधिक महिलांनी एक लाखाहून अधिक मास्क शिवले आहेत. त्यातून महिलांना उत्पन्नाचा एक चांगला स्रोत मिळाला आहे, अशी माहिती सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनच्या व्यवस्थापक माधुरी सणस यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे आमच्यासारख्या सामान्य गृहिणींचे हाल सुरू होते. परिस्थिती बेताची असल्याने काय करावे हे सूचत नव्हते. अशा वेळी सुदर्शन कंपनीने मास्क शिवण्याचा उपक्रम आम्हाला सांगितला. घरबसल्या मास्क शिवण्याचे काम मिळाल्याने घरखर्च भागवण्यास मोठी मदत झाली.
-प्रतिभा मोरे, धाटाव, ता. रोहा
सुदर्शनने कंपनीने आमच्या गावातील महिलांना मास्क शिवण्याचे काम दिले. मास्कसाठी लागणारा कच्चा मला संस्थेकडून मिळत होता. आम्ही फक्त मास्क शिवून देतो. हे मास्क विकून त्यातून मिळणार्या पैशांतून आमचे घर चालू लागले आहे.
-समृद्धी लहाने, वाशी, ता. रोहा
सुदर्शनच्या सुधा महिला बचत गटाच्या महिलांनी शिवलेले मास्क आम्ही घेतले. उत्तम प्रतीचे आणि कोरोनापासून सुरक्षित ठेवणारे असे हे मास्क आहेत. राज्यभरात गरजूंना हे मास्क वाटण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. त्यातून या महिलांनाही रोजगार मिळेल.
-सुरेंद्र श्रॉफ, पर्यावरण प्रकल्प प्रमुख, रोटरी क्लब