वाहतूक सेलच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

कडाव ः वार्ताहर
भारतीय जनता पक्षाचे वाहतूक सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या कार्यालयात रायगड जिल्ह्यातील कर्जत नेरळ येथील राजू बबन मरे यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी राजू मरे यांची महाराष्ट्र वाहतूक सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना राजकीय संघटनात्मक कामांसह सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करण्यात आपले योगदान देण्यात यावे, अशा शब्दांत पुढील कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन कांदळगावकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनुभव असलेले राजू मरे यांनी कर्जतमधील भाजपचे नितीन कांदळगावकर यांच्या माध्यमातून आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. राजू मरे यांच्या पक्षप्रवेशाने नेरळ ग्रामपंचायतीमधील पुढील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे मरे यांच्या सहकार्यांकडून बोलले जात आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत होणार्या राजकीय व सामाजिक हालचालींमुळे ही ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे राजू मरे यांच्यासारख्या एका हरहुन्नरी व्यक्तीने भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्याने नेरळमधील पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
-मंगेश म्हसकर, अध्यक्ष, कर्जत तालुका, भाजप
RamPrahar – The Panvel Daily Paper