पनवेल : बातमीदार
गड्या आपला गाव बरा, असे म्हणत अनेक रहिवाशांनी गावी जाण्याचा बेत आखला आहे. यासाठी रेल्वे, बस, अथवा खासगी वाहनाची व्यवस्था केली आहे. तर प्रारंभीच्या काळात गावात येऊ नको सांगणारे नातेवाइकही गावी या म्हणून निरोप पाठवीत आहेत. आजूबाजूला दररोज आढळणारे कोरोनाबाधित रुग्ण, शहरात वाढलेली रुग्णसंख्या, उपचारासाठी होणारी तारांबळ, जवळचे मित्र, मंडळी, आप्तेष्ट दगावण्याच्या आलेल्या बातम्या, ठप्प झालेला व्यवसाय, गमावलेला रोजगार यामुळे रहिवाशी गावाकडे जाऊ लागले आहेत. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर या संख्येत अधिक भर पडलेली आहे. रोजगार व व्यवसायाशिवाय दुसरा पर्याय नसलेले कामाधंद्यानिमित्ताने बाहेर पडत आहेत. मात्र ज्यांनी रोजगार व व्यवसाय गमावला आहे त्यांनी गावाला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत दररोज 350 ते 400 रुग्ण आढळून येत आहेत. ही सर्वाधिक संख्या शहरी भागात आहे. त्यामुळे आजूबाजूला आढळणार्या रुग्णसंख्येने शेजारी भयभीत होत असल्याचे वातावरण आहे. वाढणार्या रुग्णसंख्येला सामावून घेण्यास आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे या भीतीत अधिक भर पडत असून रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी होत नाही. टाळेबंदीत सर्वच जण घरात असल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण हे जवळच्या व्यक्तीपैकी कमी होते, मात्र टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर रुग्ण मृतांपैकी ओळखीचे, नातेवाइक, मित्रमंडळींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावाकडे जाणार्या रहिवाशांचे प्रमाण वाढले आहे. पश्चिम, उत्तर, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, या विभागीय क्षेत्रातील एमएमआरडीए क्षेत्रात नोकरी व व्यवसाय गमावणार्यांनी गावाकडची वाट पकडली असल्याचे चित्र आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची वाढलेली संख्या बघून आम्ही चिंताग्रस्त आहोत. माझा प्रिंटिंग प्रेसचा धंदा होता. तो आता ठप्प आहे. घरी लहान बाळ असल्याने काळजीचे कारण आहे. त्यामुळे कोकणात गणपतीपुळे (गावी) जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोना कहर संपत नाही तोपर्यंत येणे नाही.
–अमीर साळवी, श्रध्दा प्रिंटीग प्रेस, ऐरोली
कोरोनाच्या नकारात्मक वातावरणापासून दूर जाण्याची इच्छा असून गाव हा त्याला पर्याय आहे.
-धीरज बेलोकर, बेरोजगार