पाच दिवसांची पोलीस कोठडी
पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेलमधील शेकापचा माजी नगरसेवक सुनील गोविंद बहिरा यास पनवेल पोलिसांनी गजाआड केले असून गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फसवणूक आणि वारंवार लोकांमध्ये दहशत माजवण्याचा उपक्रम हाती घेतलेल्या सुनील बहिरा याला तक्का गावातील नागरिकही हैराण झाले आहेत. नागरिकांची फसवणूक आणि दमबाजी नित्यनेमाची असल्याने अखेर तक्का गावातील विशाल धर्मा पगडे यांनी सुनील बहिरा याच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात व पनवेल महापालिकेस पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चौकशी करून पालिकेचे अधिकारी नितीन हुद्दार यांनी शासनाच्या वतीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिरा हा तक्का गावातील असून त्याने सन 1997मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे तत्कालीन पनवेल नगर परिषदेकडून अंतिम भूखंड क्रमांक 1633 ब आणि 1637वर इमारत बांधकाम परवानगी मिळवलेली आहे. हे दोन्ही भूखंड हे सुनील बहिरा यांचे वडील कै. गोविंद काथोर बहिरा यांच्या मालकीचे होते. गोविंद बहिरा यांचे निधन 17 नोव्हेंबर 1977 रोजी झालेले आहे. सुनील बहिरा याने गोविंद बहिरा हे मयत असतानादेखील त्यांच्या जागी तोतया व्यक्ती उभा करून पनवेल कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर 20 रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र केलेले आहे आणि हा स्टॅम्प पेपर सुनील बहिरा याने विकत घेतल्याची नोंद या स्टॅम्पवर नमूद आहे. हे शपथपत्र विशाल पगडे यांनी माहिती अधिकारात प्राप्त केलेले आहे.
कै. गोविंद काथोर बहिरा हे सन 1977मध्ये मयत असताना प्रॉपर्टीसाठी सन 1997 साली त्यांच्या नावाने शपथपत्र केले गेले असून त्यांचा खोटा अंगठा सुनील बहिरा याने या स्टॅम्पवर मारून त्रयस्थ व्यक्ती गोविंद बहिरा असल्याचे भासवले आणि मयत व्यक्तीला जिवंत दाखवत शपथपत्राचा फायदा घेऊन बांधकाम परवानगी मिळवली होती. या अनुषंगाने शासनाची गंभीर फसवणूक केल्याबद्दल विशाल पगडे यांनी पोलिसांकडे दाद मागितली. मागील महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा पाठपुरावा त्यांनी केल्याने अखेर सुनील बहिरावर भा.दं.वि. कलम 417, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपी सुनील बहिरा यास शुक्रवारी (दि.24) पनवेल न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
शासनाची फसवणूक करणे हा संवेदनशील गुन्हा असताना मागील महिन्यात तक्रार दाखल करूनही अटक करण्यास उशीर झाला असला तरी झालेल्या कारवाईमुळे समाधान व्यक्त करीत आहे. इतके गुन्हे असतानाही उजळ माथ्याने फिरण्याचे काम आरोपी करीत होता. कायदा सुव्यवस्थेचा विचार करता अशा आरोपींना जरब बसली पाहिजे, असे मत तक्रारदाराने व्यक्त केले आहे.
या बांधकामावर अनधिकृतरित्या टॉवर उभारल्याचीदेखील तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे. फसवणूक करणे, दमदाटी करणे, मारहाण करणे अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी सुनील बहिरा याच्यावर तक्का ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. सुनील बहिरा हा स्वतःच्या पूर्वपदाचा वापर करून तक्का आणि परिसरामध्ये निरनिराळ्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावणे, त्यांच्याकडून जबरदस्तीने सप्लाय घेणे आणि ग्रामस्थांचा हक्क डावलणे याबाबतीत कुख्यात असून त्यांच्या या कारस्थानाला संपूर्ण ग्रामस्थ कंटाळले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.