कळंबोली : बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा माझे कुटुंब माझी जबाबदारी हा सामाजिक जनजागृती करणारा कार्यक्रम कळंबोलीमध्ये प्रत्यक्षात नागरिकांच्या पसंतीत उतरत आहे. शुक्रवारी (दि. 2) कळंबोलीमधील सोसायट्यांमधून माझे कुटुंब माझे जबाबदारी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने रंगला. कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे पुढाकार महापालिकेतील भाजप नगरसेवक बबन मुकादम यांनी घेतला होता तर या अभियानामध्ये महापालिकेचे सहाय्यक आयुक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या जनजागृती प्रबोधनात्मक पथनाट्यास नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगरसेवक बबन मुकादम व त्यांच्या सहकार्यांनी कळंबोली मधील विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन कोरोनाबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत जनजागृतीपर शासनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला गेला. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य प्रिया मुकादम, महापालिकेच्या सहाय्यक सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे तृप्ती सांडभोर, वैद्यकीय बिल लेखापरीक्षण अधिकारी अशोक जाधव, वैद्यकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, जगदीश पाटील व गृहनिर्माण संस्थांमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने व कुटुंबांनी कोणती खबरदारी घेऊन महामारीबाबत कसे संरक्षण करायचे, कोणकोणत्या उपाययोजना करावयाच्या आहेत याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी उपस्थितांना दिली. या वेळी गुरुविला हाउसिंग सोसायटी, अमर गुरुप्रेम हाउसिंग सोसायटी, अमरदीप हाउसिंग सोसायटी मधील नागरिकांचे ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले तसेच कोरोनाबाबत जनजागृती करणारे माहितीपत्रकही या वेळी हाउसिंग सोसायटीमधून वितरित करण्यात आले.