Breaking News

माथेरान पर्यटकांनी गजबजले; स्थानिक सुखावले

कर्जत : बातमीदार

तब्बल साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर 2 सप्टेंबर रोजी माथेरान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आणि पर्यटकांची पावले माथेरानकडे पुन्हा वळू लागली. रविवारी (दि. 4) सुटीच्या दिवशी हे पर्यटनस्थळ गजबजल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.समुद्रसपाटीपासून 803 मीटर उंचीवर सह्याद्री पर्वतरांगेत असलेले टुमदार पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. येथील स्थानिकांचा पर्यटनावरच उदरनिर्वाह चालतो. बंदी उठल्यानंतर सुरुवातीला पर्यटक कमी प्रमाणात येत होते, परंतु जसजसे दिवस पुढे जात आहेत तशी पर्यटक संख्या वाढताना दिसत आहे. 2 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या एक महिन्याच्या कालावधीत 10 हजार 55 पर्यटक दाखल झाले होते, तर 2 ऑक्टोबर गांधी जयंती तसेच त्यानंतर शनिवार व रविवार अशी जोडून सुटी आल्याने तीन हजार 500 पर्यटकांनी हजेरी लावली, असे कर प्रमुख राजेश रांजाणे यांनी सांगितले.

पार्किंग हाऊसफुल

पर्यटन सुरू होऊन एक महिना उलटल्यानंतर माथेरानमध्ये पर्यटक संख्या वाढू लागली आहे. महात्मा गांधी जयंतीला पर्यटक आपल्या खासगी वाहनांनी माथेरानमध्ये दाखल झाले आणि पाहता पाहता येथील एकमेव असलेले पार्किंग फुल झाले. रविवारी 400 वाहने आणि 450 बाईक या पार्किंगमध्ये पार्क झाल्याचे येथील व्यवस्थापक राहुल बिरामणे यांनी सांगितले.

पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम देत आहोत. पर्यटकांच्या आत्मिक समाधानासाठी राहणे व खाण्या-पिण्यात सवलत दिली आहे.

-अमोल भारती, व्यवस्थापक, एमटीडीसी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply