चौघांना अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
गुजरातमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र, ट्रकमधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने रबाळे एमआयडीसी येथे छापा टाकून कारवाई करीत 35 लाखांचा गुटखा, 14 लाख रुपये किमतीची तीन वाहने असा 49 लाख 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुजरातवरून ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन भालेराव यांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत, वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक विनया पारासूर, हवालदार सचिन भालेराव, कासम पिरजादे, इकबाल शेख यांच्या पथकाने गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रबाळे एमआयडीसीमधील ओयो सिल्वर हॉटेलसमोरील मोकळ्या मैदानाभोवती सापळा रचला होता.
ट्रकमधून पिकअप व कारमध्ये गोण्या भरल्या जात असताना पोलिसांनी छापा मारला असता विमल कंपनीचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी जितू दास (28), प्रियव्रत दास (25), मुन्ना यादव (28) व अखेय खोंडा (22) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर ट्रक चालकाने अंधारात पळ काढला. अटक केलेल्या चौघांसह पळालेल्या ट्रक चालकाविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.