Breaking News

टोलवाटोलवी नको, शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या!

देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी

बारामती : प्रतिनिधी
शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करणारच आहे, पण केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. टोलवाटोलवी नको, राज्य सरकार काय करणार हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची मागणी असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवार (दि. 19)पासून तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी बारामतीपासून आपल्या दौर्‍याला प्रारंभ केला. त्या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, दौंडचे आमदार राहुल कुल, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी पदाधिकारी तसेच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद यावर वाद करीत बसण्याची ही वेळ नाही. सरकारने पहिल्यांदा शेतकर्‍यांकडे लक्ष द्यावे. शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. याच्या पूर्वीही असे झाले आहे. आम्हीदेखील हे पाहिले आहे. राज्यपालांबरोबर यापूर्वीही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नसून शेतकर्‍याला काय मदत मिळणार हे महत्त्वाचे आहे.
जेव्हा पुराचे संकट राज्यावर आले तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून आम्ही सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले. मोदी सरकार मदत करेलच, पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? दरवेळी संकट आले की जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलायची आणि आपण नामानिराळे रहायचे हे ठाकरे सरकारचे धोरण योग्य नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.
राज्याने यापूर्वीही 70 ते 80 हजार कोटींचे कर्ज काढले होते. कर्जाची मर्यादा आता एक लाख 10 कोटी करण्यात आली आहे. शेतकर्‍यांवर अस्मानी संकट आले असून, केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकारने तातडीची मदत न करता नुकसानग्रस्तांवर सुलतानी संकट आणू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले. लोकांमध्ये रोष निर्माण झाला असून, आम्ही विरोधी पक्ष म्हणून मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी शेतकर्‍यांना दिले.
राज्य सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकला नव्हता. आम्ही दौरा करायला लागल्यामुळे सगळे जण आता जनतेच्या भेटीसाठी घराबाहेर पडले आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
नाकर्त्या सरकारचा बचाव हेच शरद पवारांना एकमेव काम
महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा समोर आला असून, तो लपवण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचे एकमेव काम शरद पवार यांना उरले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली. तुळजापूरमधील गव्हर्न्मेंट सर्किट हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री घरातून का काम करतात या संदर्भातील स्पष्टीकरण दिले. त्यावर बोलताना फडणवीस यांनी पवार फक्त नाकर्त्या राज्य सरकारचा बचाव करण्याचे काम करीत असल्याचा टोला लगावला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply