नागोठणे : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज, व्याघ्रेश्वर मंदिरातील नवरात्र उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शासनाचे सर्व नियम पाळूनच मंदिरात नवरात्र साजरा करण्यात येत असल्याचे उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष विनायक गोळे आणि पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. या उत्सवात दरवर्षी घेण्यात येणारे कीर्तन, गरबा, नाचाचे सामने तसेच संगीत भजन आदी कार्यक्रम या वर्षी घेण्यात येणार नाहीत, मात्र नवरात्रोत्सवाच्या दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता घेण्यात येणारी आरती फक्त चार ते पाच भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच दर्शन घ्यावे यासाठी काळजी घेतली जात आहे. दिवसभरात अनेकदा मंदिरात सॅनिटायझरची फवारणी करून घेण्यावर उत्सव समितीने लक्ष दिले असल्याचे बाळासाहेब टके यांनी सांगितले.