माणगाव : प्रतिनिधी
परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. माणगाव तालुक्यातही भातपीक भिजून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य शासनाने तत्काळ थेट मदत द्यावी, अशी मागणी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.गेल्या सात-आठ महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच हैराण झाले आहेत. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने रायगडातील शेतकर्यांची भातशेती जमीनदोस्त झाली. आता परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरीराजा हवालदिल झाला असून, त्याला तत्काळ मदतीची आवश्यकता आहे. परतीच्या पावसाने केलेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने थेट मदत द्यावी, असे ढवळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.