मुरूड : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांना येथील जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याने मुरूड तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असून कोरोनामुक्त होणारा हा राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे, असा दावा तहसीलदार गमन गावित यांनी केला. ते रविवारी (दि. 18) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुरूड तालुक्यात आतापर्यंत 431 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामधील 23 जणांचा मृत्यू झाला. सहा जणांवर उपचार सुरू असून, तेही थोड्या दिवसांत बरे होऊन आपल्या घरी जातील. उर्वरित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती तहसीलदार गावित यांनी पत्रकारांना दिली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनसह अनेक उपाययोजना केल्या. त्याला येथील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. तालुका कोरोनामुक्त करण्याचे श्रेय प्रामुख्याने जनतेला जाते. त्याचबरोबर महसूल, पोलीस, आरोग्य विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद कर्मचारी तसेच सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक-शिक्षिका यांनी जीवाची पर्वा न करता कोरोनामुक्तीसाठी चांगले काम केले आहे. त्यामुळे मुरूड तालुका कोरोनामुक्त होण्यास मदत मिळत असल्याचे गावित यांनी सांगितले. दरम्यान, तालुका कोरोनामुक्त झाला तरी कोरोनाचा पुन्हा शिरकाव होऊ नये याकरिता मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे ही त्रिसूत्री आपल्याला पाळायलाच हवी. तरच तालुका पूर्णत: कोरोनामुक्त होईल. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा, असे आवाहन तहसीलदार गमन गावित यांनी केले आहे.