Sunday , October 1 2023
Breaking News

खंडणीविरोधी पथकाकडे वाहनचोरीचा तपास, वाढत्या वाहनचोरीमुळे आयुक्तांचा निर्णय

पनवेल बातमीदार : नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी खंडणीविरोधी पथकाचे विसर्जन करून वाहनचोरी शोधपथकाची स्थापना केली आहे. वाहनचोरीने पोलिसांची झोप उडवल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यात खंडणीच्या प्रकाराला आळा बसवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिवे मारण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे मुंबईतील लोण नवी मुंबईतसुद्धा पसरू शकते, यामुळे सुरुवातीपासूनच नवी मुंबईत खंडणीविरोधी पथक कार्यरत होते. या पथकाने अनेक उत्तम कामे केली असून नुकतेच चार पोलीस आयुक्तालय क्षेत्रांसाठी डोकेदुखी बनलेल्या अल्पवयीन मुलींचे शोषण करणार्‍याच्या मुसक्या आवळणे असो वा मुंबईतील एका प्रथितयश बँकेच्या संचालक अपहरण व हत्येच्या गुन्ह्याची उकल असो, असे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. मात्र काही वर्षांपासून या पथकाकडे फारसे कामच नव्हते. गेल्या वर्षी केवळ सहा अर्ज आले. तीन जुने अर्ज असे केवळ नऊ तक्रारींच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एवढे मनुष्यबळ गुंतवणे व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला व या पथकाला तिलांजली देण्यात आली. आता या पथकातील मनुष्यबळ वाहनचोर्‍या रोखण्यासाठी वापरण्यात येणार आहे. आयुक्तालय क्षेत्रातील वाढती वाहनचोरी पाहता हे गुन्हे कसे रोखावेत, असे आव्हान पोलिसांसमोर असून त्याची तोड अतिशय तल्लख असलेल्या खंडणीविरोधी पथकाकडे असेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

  • नव्या पथकाकडे कामांची यादीच सादर

वाहनचोरी रोखण्यासाठी पूर्णवेळ पथक निर्माण केल्याने त्यावर आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक वाहनचोरीच्या घटनास्थळी भेट देणे, त्याचा योग्य तो मागोवा घेणे, प्रत्येक गुन्ह्याचा अभ्यास करून गुन्हे चोरी पद्धतीचे वर्गीकरण व त्याचा छडा लावणे, जेथून वाहन चोरी झाले तेथील सीसीटीव्ही रेकॉर्डिग पाहून वाहनांचा माग काढणे, वाहनचोरीत रेकॉर्डवरील आरोपीचा माग काढून लक्ष ठेवणे, बेवारस गाडयांचा मूळ मालक शोधून कारवाई करणे, वाहनचोरी रोखण्यासाठी जनजागृती करणे आदी कामांची यादीच या नव्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

  • काय आहेत आव्हाने?

सध्या निवडणुकीचा काळ असल्याने लक्झरी गाडया, 15 आसनी गाडया व दुचाकी चोरीत वाढ होत असते. या गाडया परप्रांतात खासकरून उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये लगेच रवाना करण्यात येतात. त्यामुळे या चोर्‍या रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. सध्या या पथकात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तीन साहाय्यक पोलीस निरीक्षक, 13 हवालदार व अन्य कर्मचारी मिळून 30चे मनुष्यबळ आहे.

  • 2018 मध्ये 843 वाहनचोरीच्या घटना

वाहनचोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असून 2017 मध्ये 586 वाहने चोरीला गेली होती, तर 2018 मध्ये 843 वाहने चोरी झाली आहेत. यातील केवळ 30 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2019 मध्ये दुसरा महिना अध्र्यावरच आला असताना गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 30 टक्के वाहनचोरीच्या वाढीने पोलिसांची झोप उडवली आहे.

खंडणीविरोधी पथकाकडे पूर्ण पथक काम करील एवढे काम नसते. म्हणून वाहनचोरी शोधपथकाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. वाहनचोरीचे वाढते प्रमाण आणि तपास यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ पाहता या पथकाचे मनुष्यबळही वाढवण्यात येणार आहे.    – तुषार दोषी, उपायुक्त, गुन्हे शाखा

Check Also

भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी गुरुवारी (दि. 10) …

Leave a Reply