पनवेल : रामप्रहर वृत्त
नवरात्र हा स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा उत्सव त्यातही सप्तमी म्हणजे ‘सरस्वती पूजन’ विद्येच्या देवतेची पूजा करण्याचा दिवस. दरवर्षी चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमात सरस्वतीपूजा मोठ्या उत्साहात केली जाते. याही वर्षी हा उत्सव ऑनलाइन पण मोठ्या जल्लोषात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने झाली. या वेळी रिया राणे आणि सानिका जाधव यांनी सरस्वतीचे स्तवन गायले. नंतर मोनालिसा सामंता या विद्यार्थिनीने दुर्गा देवीचे मधूर बंगाली गीत सादर केले. पर्यवेक्षिका लक्ष्मी निरजा यांनी नवरात्रीचे महत्व सांगुन प्रमुख पाहुण्या डॉ. अपेक्षा माठे (माजी विद्यार्थिनी) यांचा परिचय करून दिला. डॉ. अपेक्षा या नुकत्याच डॉक्टर झाल्या असून सध्या मुंबई महानगरपालिकेतच्या रुग्णालयात कोविड योद्धा म्हणून कार्य करत आहेत. याचा शाळेला अभिमान आहे, असे निरजा मॅडम यांनी सांगितले.
सोहम इंदुलकर या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. ईशा गोरडे हिने महिषासूर मर्दिनी स्तोत्र सादर केले. सई जोशी आणि श्रावणी थळे यांनी नयनमनोहर नृत्ये सादर केली. तर स्वर व वेदिका म्हात्रे या भावंडांनी ‘आई भवानी’ हा जोगवा गाऊन उपस्थितांची मने जिंकली. डॉ. अपेक्षा यांनी आपल्या भाषणात शाळेतील संस्कारांचे महत्त्व सांगत नारीशक्तीचा सन्मान कराच पण स्वत:तील उर्जा शक्ती ओळखून तिला योग्य मार्गाने न्या असे विद्यार्थ्यांना सांगितले.
मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी नवरात्र उत्सवाला नवदुर्गेच्या रूपात वावरणारी माजी विद्यार्थीनी अपेक्षा माठे लाभली हा एक सुंदर योगायोग आहे असे सांगत पीपीई किट हेच अस्त्र हाती धरून कोरोनारुपी राक्षसाचे निर्दालन करणार्या डॉ. अपेक्षा हिचा शाळेला अभिमान आहे असे सांगितले. नवरात्रीनिमित्त ऑनलाइन भक्तसंगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चव्हाण सर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला आणि विजयी तसेच स्पर्धक सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्वात शेवटी मार्वज सोनावले या विद्यार्थ्याने सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी पुरोहित या विद्यार्थिनीने केले.
एकंदरच ऑनलाइन पद्धतीने साजरा झालेला हा समारंभ अतिशय सुंदर झाला. प्रमुख पाहुण्या डॉ. अपेक्षा यांनी विद्यालयाने नवीन तंत्रज्ञानाची कास धरत प्रत्येक समस्येवर मात करत चालवलेल्या या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले.