मुंबई : प्रतिनिधी
शिखर बँक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान मिळाले असून, या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मूळ तक्रारदार सुरिंदर मोहन अरोरा यांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे. त्यांच्यासोबत इतरही काही लोकांनी याविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करणार्या एसआयटीने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुंबई सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता आणि त्यात 70 जणांविरोधात कोणताही पुरावा नाही असे सांगत संबंधितांना क्लीन चिट देण्यात आली होती. हे प्रकरण फार जुने आहे. त्यामुळे आता या संदर्भात कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असा दावा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. याला आता आव्हान देण्यात आले असून, लवकरच त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिखर बँकेने साखर कारखाने, सूत गिरण्या आणि इतर अनेक संस्थांना भरमसाठ नियमबाह्य कर्जे दिली आणि संबंधित संस्थांनी या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे ठेवीदारांचे 25 हजार कोटी रुपये बुडाले असा आरोप मूळ याचिकेत करण्यात आला होता. यात राष्ट्रवादी, शिवसेना व इतर पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांची नावे होती. यावर रिझर्व्ह बँकेने 2011मध्ये तत्कालीन संचालक मंडळावर ठपका ठेवत ते बरखास्त केले होते. याबाबत आता याचिका दाखल झाल्याने प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे.