Breaking News

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे तसेच याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) ही केंद्र सरकारची योजना केंद्राच्या निधीतून, पण राज्य सरकारमार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फतच होते. या योजनेत कंत्राटी तत्त्वावर काम करणार्‍यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधाने मंत्र्यांकडून आल्यानंतर कायमस्वरूपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला आहे. या संदर्भात दूरध्वनी संवादाच्या तीन ऑडिओ क्लिपसुद्धा या पत्रासोबत जोडत आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे. या ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार सुमारे 20 हजार असे उमेदवार राज्यात असून, त्यांना सेवेत कायम करण्यासाठी त्यांच्याकडून एक ते 2.50 लाख रूपये घेतले जात आहेत. म्हणजेच यासाठी सुमारे 300 ते 400 कोटी रुपये जमा होत आहेत. हे सारे कुणाच्या आशीर्वादाने होत आहे, याचीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. सेवेत कायम करण्यासाठी सुमारे 400 कोटींची उलाढाल महाराष्ट्रात होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. प्रत्यक्षात उमेदवारांकडून एक रुपयांचे सहमतीपत्र आणि 500 रूपये लढा निधी असे संकलन करीत अर्जावर स्वाक्षरी घेतली जाते आणि सोबत एक ते दोन लाख रुपयांदरम्यान रोख असलेला लिफाफा वेगळा देण्यास सांगितला जात आहे. ही रोख रक्कम देताना नोटा या 500 आणि 2000 रुपयांच्याच असाव्यात, असेही सांगितले जात आहे. हा पैसा देण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतले आणि त्यांनी तो पैसा जमा केला. काही लोक एकमेकांना बँकेतून पैसे काढून रोख हातात ठेवा, केव्हाही भरावे लागतील असे सांगत आहेत. काही खास बँक खातीसुद्धा यासाठी उघडली गेली आहेत. हा संपूर्णच प्रकार अतिशय गंभीर असून, केवळ एका अभियानात सेवेतील कायम नियुक्तीसाठी अशा पद्धतीने 400 कोटींची भ्रष्टाचार होत असेल, तर कोरोनाच्या कालखंडात आणि तेही आरोग्य क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतोय याची कल्पनाही न केलेली बरी. या ऑडिओ फितींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सरकारमधील कुणाच्या आशीर्वादाने हा प्रकार होतोय याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply