Breaking News

स्वस्तिका घोषने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले रौप्यपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त
नार्कोटिक बोर्ड ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 तसेच इंडोशियन क्लब लीग सेशन या दोन्ही स्पर्धांमध्ये पनवेलच्या स्वस्तिका घोष हिने महिला एकेरी खुल्या गटात रौप्यपदक पटकावित भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते स्वस्तिकाचा सत्कार करण्यात आला.
या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, हरिश्चंद्र पाटील, स्वस्तिकाचे वडील संदीप घोष उपस्थित होते.
नार्कोटिक बोर्ड ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशियाच्या वतीने बाली येथे इंटरनॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चीन, जपान, कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर या देशातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत भारताकडून पनवेल येथील स्वस्तिका घोषने प्रतिनिधित्व केले. तिने या स्पर्धेत दमदार खेळी करीत अंतिम फेरी गाठली आणि रौप्यपदकाला गणसणी घातली.
स्वस्तिकाचा चमकदार खेळ पाहता थेट इंडोशियन क्लब लीग सेशन स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे ही स्पर्धा खेळणारी स्वस्तिका भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. यामध्येही तिने आपल्या नेत्रदीपक कामगिरी आणि आक्रमक शैलीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात 3-4, 2-3ने सेट स्कोअर गमावला. त्यामुळे या स्पर्धेतही ती रौप्यपदकाची मानकरी ठरली.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. तिने लहानपणापासून टेबलटेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे. त्यामुळे तिला विराट कोहली फाऊंडेशनकडून स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेलेली ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे. टेबल टेनिससाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तिला वेळोवेळी आर्थिक मदत करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी खारघर येथील विद्यालयात विशेष सोय केली आहे. स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत.

Check Also

खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात 4 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, …

Leave a Reply