दरभंगा : वृत्तसंस्था
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला बुधवारी (दि. 28) सुरुवात झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची दरभंगा येथे रॅली झाली. या वेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘आज सर्वांची नजर अयोध्येवर आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवत आहेत, असे मोदी म्हणाले. दरभंगा येथील रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींनी शेतकर्यांना दिल्या जाणार्या मदतीवरही भाष्य केले. प्रत्येक शेतकर्याच्या थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार असल्याचे सांगितले होते. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आम्ही गरीबांना बँक खाती देऊ असे सांगितले होते. आज जवळपास 40 कोटी गरीबांची बँक खाती उघडली आहेत. आम्ही उज्ज्वला योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेतंर्गत बिहारमधील जवळपास 90 लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहेे. आम्ही प्रत्येक गरीब व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची घोषणाही केली होती. आज बिहारच्या प्रत्येक गरीब व्यक्तीला याचा लाभ मिळत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पैसे हजम केले की परियोजना संपली असे यापूर्वीच्या सरकारचे धोरण होते. त्यांचे ‘कमिशन’ या शब्दावर अतिशय प्रेम होते. म्हणून त्यांनी कनेक्टिव्हीटीवर लक्ष दिले नाही. केंद्रात एनडीएचे सरकार आल्यानंतर कोसी महासेतूचे काम जलद गतीने सुरू झाले. काही दिवसांपूर्वी त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभले. यामुळे 300 किलोमीटरचे अंतर 20-22 किलोमीटरवर आले. आता आठ तासांचा प्रवास अर्ध्या तासांत पूर्ण होत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी या वेळी नमूद केले.