मुरुड : प्रतिनिधी
तारुण्यात येणार्या मुलांनी स्वतः सक्षम बनून कोणत्याही अमिषाला बळी न पडता येणार्या पेचप्रसंगावर मात करण्यास शिकणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी मुरूड येथे केले.
बाल सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने रायगड पोलीस दल, मुरुड पोलीस ठाणे व अंजुमन इस्लाम महाविद्यालयातील महिला विकास कक्ष यांच्या सयुंक्त विद्यमाने सोमवारी (दि. 18) बालकांवरील लैंगिक अत्याचार व त्यापासून बालकांचे संरक्षण या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सोनाली कदम उपस्थित मुलांना मार्गदर्शन करीत होत्या. सध्याच्या वातावरणात तारुण्यात येणार्या बालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
कुमारावस्थेत येणार्या विद्यार्थांनी सभोवतालच्या परिस्थितीत सतर्क राहून समस्यांना सामोरे जाण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांनी केले. मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार, उपनिरीक्षक प्रशांत शुभनावळ, अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेचे सचिव हिफझूर रेहमान नझीरी, खजिनदार अल्ताफ मलिक, महाविद्यलाय विकास समितीचे सदस्य तौसिफ़ फत्ते, अंजुमन प्रायमरी स्कूलचे चेअरमन हाफीजु कबले, अंजुमन हायस्कूलचे प्राचार्य जाहिद गोठेकर यांच्यासह विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. श्रुती कारभारी यांनी विशेष प्रयत्न केले.