नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई पालिका दाखल करणार गुन्हा दाखल
नवी मुंबईला काही वर्षांत विकासाच्या नावाखाली सिमेंटचे स्वरूप आले आहे. बेसुमार वृक्षतोड शहराच्या मुळावर उठली आहे. वायू प्रदूषणाने नवी मुंबईकरांना पुरते हैराण केले आहे. ही बाब गंभीर्याने घेत अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी धडाडीचे पाऊल उचलले आहे. विनापरवानगी वृक्षतोड/वृक्षछाटणी करणार्यांवर नियमानुसार दखलपात्र गुन्हे नोंद करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकारी यांना देण्याविषयी पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एखादा वृक्ष विकास कामामध्ये येत असेल तर तो तोडण्यासाठी / त्याची छाटणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र अनेकजण या परवानग्या घेणे टाळत असल्याचे आढळून येते. महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण कार्यरत आहे. त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रात कुठेही कोणत्याही प्रकारचा वृक्ष तोडावयाचा असल्यास अथवा वृक्षछाटणी करावयाची असल्यास वृक्ष प्राधिकरणाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असते. तथापि अनेकदा अशाप्रकारची परवानगी न घेताच वृक्ष तोड करणे अथवा वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते.
अशा प्रकारे विनापरवानगी वृक्षतोड/वृक्षछाटणी करून पर्यावरणाला हानी पोहचविणे हा गुन्हा असून याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविला जात होता. मात्र या अदखलपात्र गुन्ह्याची कोणीही दखल न घेत नसल्याने विकासाच्या नावाखाली अवैध वृक्षतोड करणार्यांचे फावले होते. त्यामुळे अनेक पर्यावरणवादी संघटना देखील आशा वृक्षतोड करणार्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी सातत्याने करत होते. त्यानुसार महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम 2009 सह शासन आदेश अधिसूचना मधील कलम 21(1) व 2 नुसार हे दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
संबंधित विभाग कार्यालय क्षेत्रातील उद्यान अधिक्षकांमार्फत हे दखलपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या नोंदीत गुन्ह्यांसंदर्भात न्यायालयीन प्रकरणांबाबत महानगरपालिकेचा विधी विभाग आणि तालिका वकील यांच्याशी समन्वय ठेवून प्रकरणांचा निपटारा करण्याची जबाबदारी आपापल्या परिमंडळांसाठी परिमंडळ 1 व 2 च्या प्रभारी उद्यान अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
आयुक्तांचे पर्यावरणवादी पाऊल
वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा र्हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबली पाहिजे. नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई पालिका आयुक्तांनी पर्यावरणवादी पाऊल उचलले आहे. वृक्षछाटणी करणार्यांवर नियमानुसार दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार ओहत. त्यामुळे वृक्ष तोड थांबण्यास मदत होणार आहे.