रेवदंडा : प्रतिनिधी
कौशल्याचार्य या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित चौल येथील रेखा संदीप घरत यांचा जन शिक्षण संस्थानच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. मेधा सोमय्या यांच्या उपस्थितीत व माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालय अंतर्गत जन शिक्षण संस्थान अलिबाग-रायगडच्या प्रशिक्षक आणि चौलच्या चंपावती स्वयंम सहाय बचत गटाच्या अध्यक्ष असलेल्या रेखा घरत यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने नुकतेच कौशल्याचार्य या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचा जन शिक्षण संस्थानच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. मेधा सोमय्या यांनी माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या हस्ते चौल येथील निवासस्थानी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी जन शिक्षक संस्थानचे संचालक विजय कोकणे, सन 2019च्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अनिता मोरे, संदीप घरत आदी उपस्थित होते. चौलमध्ये चंपावती स्वयंम सहाय्य बचत गटाची स्थापना करून त्यामार्फत विविध स्तुत्य उपक्रम व सामाजिक बांधिलकीचे काम प्रशिक्षिका रेखा घरत करतात. या बचत गटाच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत 38 हजार मास्क बनवून देऊन तीन लाख 80 हजार रुपये निव्वळ नफा प्राप्त केला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन शासनाच्या वतीने त्यांना कौशल्याचार्य या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन करण्यात आले. याशिवाय घरत ह्या जन शिक्षण संस्थानच्या माध्यमातून चौलमध्ये महिला, युवतींना टेलरिंग प्रशिक्षण देत असून, आतापर्यंत अनेकींना प्रशिक्षित केले आहे.