पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड सेक्टर 12 येथे दहा एकर परिसरात साकारण्यात येणार्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वर स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 7) झाले. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आनंद देणारा हा भूमीपूजन सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे, असे प्रतिपादन केले.
या सोहळ्यास रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, रेमंड समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, तिरूमला देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तिरुमला ट्रस्टचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत म्हटले की, आनंद देणारा हा भूमिपूजन सोहळा असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे. प्रत्येकाला आंध्र प्रदेश राज्यात जाऊन तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जायला जमत नाही. अशा वेळी या ठिकाणी येऊन तिरुपती बालाजीचे दर्शन होणार आहे. हे मंदिर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.
महाराष्ट्रात तिरुपती बालाजीचे मंदिर साकारत असल्याबद्दल तिरूमला ट्रस्ट चे तसेच या पवित्र कामात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले आहे त्या सर्वांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी आभार मानले.
या वेळी तिरूमला ट्रस्टचे अध्यक्ष रेड्डी यांनी या मंदिराच्या साकारण्याविषयीची थोडक्यात माहिती दिली.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper