Breaking News

ढाले, मुंडले आणि धोंडगे : तीन वाटा-एक ध्येय

काही दिवसांपूर्वी राजा ढाले आणि भास्करराव मुंडले यांचे निधन झाले आणि केशवराव धोंडगे ह्यांनी आयुष्याची 100 वर्षे पूर्ण केली. तिघे बर्‍याच अंशाने प्रतीकात्मक असून 60 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र कळायला उपयोगी पडणारे आहेत. ब्राह्मणब्राह्मणेतर वाद, सावरकरांची उपेक्षा आणि ह्या ना त्या प्रकारे शरद पवारांवर रुचीपूर्ण चर्चा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील काही ठळक विशेष आहेत. धोंडगे 1957पासूनचे आमदार. मराठवाड्यातले. बुटके पण भरदार शरीराचे. केव्हाही शड्डू ठोकण्याच्या सिद्धतेत, मात्र एरव्हीच्या बोलण्यात अत्यंत विनम्र. विधानसभेत त्यांच्यासारखा तळमळीच्या भावनाप्रधान वक्तृत्वाने सगळ्या सभागृहाला वरच्या पातळीवर घेऊन जाणारा आणि प्रत्येकाचे अंतकरण गदगदवून सोडणारा दुसरा वक्ता ह्या विधानसभेत मी पाहिला नाही. खेड्यापाड्यात  नाही रे वर्गच राहतो आणि शासनाची धोरणे बरी असली तरी कार्यवाहीत माणुसकीचा ओलावा नसल्याने तो कसा अर्धपोटी आणि वंचित राहिला आहे हे धोंडगे आतडी पिळवटून सांगत. प्रश्नोत्तराच्या तासापासून शेवटच्या अर्ध्या तासाच्या चर्चेपर्यंत मिळेल त्या वैधानिक आयुधांचा वापर करून शेतकरी कसा फसवला जात आहे हे केशवरावांनी इतके कंठशोष करून सांगितले की त्यामुळे सरकारी यंत्रणा वेळीच हलली असती तर पुढच्या आत्महत्या कदाचित टळल्या असत्या. केशवराव मातृभक्त होते आणि सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्यात हीच भक्ती दृग्गोचर होत असे. मारोतराव कन्नमवार वापरात नसलेल्या म्हणींनी आपले भाषण सजवीत, तर केशवरावांचे भाषण ऐकल्यावर सगळे संत आणि शाहिरी वाङ्मय सहज कानावर पडे आणि वेगळा साहित्यिक आनंद मिळे. ते इतक्या द्रुतगतीने बोलत की लघुलिपिकांचीही तारांबळ उडे.  केशवराव शेकापचे होते, पण अमुक एका जातीच्या द्वेषाची धार त्यांच्या भाषणांना नसे. सभापतींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे मेजवानीचा आस्वाद घ्यावा तसे त्यांचे भाषण कान  देऊन ऐकत. मोठ्या गवय्याचे गाणे संपल्यावर

निःशब्दता पसरते तसे त्यांचे भाषण आटोपल्यावर होत असे. त्यांचे भाषण म्हणजे एक पराकोटीचा  ’परफॉर्मन्स’ असे. काही वेळा शब्द आणि भावना एकमेकांना इतक्या घासून जात की ते कोसळून सभागृहात पडतील की काय अशी भीती वाटे. ते शेकापचे होते, पण त्या विशिष्ट साच्यात बसणारे नव्हते. महाराष्ट्रात काँग्रेस संस्कृतीने आमदाराचा एक साचा बनवला आहे. हा आमदार हळूहळू मालकाच्या भूमिकेत जातो आणि रयतेला नोकरासारखे वागवतो. केशवरावांनी ही चौकट निग्रहाने नाकारली होती.  ते स्वतंत्र होते कारण त्यांची मातीशी नाळ कधीही तुटलेली नव्हती. एकदा विधान परिषदेचे सभापती असलेल्या जयंतराव टिळकांविषयी ते विधानसभेत चुकीचे बोलले. मी लॉबीत जाऊन त्यांना केशवराव जेधे आणि जयंतरावांचे  संबंध किती सौहार्दाचे होते हे लक्षात आणून दिले तेव्हा आपली चूक मान्य करून त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले आणि शेवटी मतभेद तात्पुरते असतात. सगळे जण एकाच दिशेने जात असतात,  असे उद्गार काढले. केशवराव  माझे तुम्हाला दंडवत. तुम्ही महाराष्ट्राचा वैधानिक वारसा वैभवसंपन्न केला आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर तो साम्यवादाकडे झुकणार की काँग्रेस संस्कृती त्याला खाऊन टाकणार, हा प्रश्न जाणकारांना भेडसावू लागला होता. दलितांच्या भूमिकेला महत्त्व येणार होते आणि रा. स्व. संघ समन्वय कसा साधणार हेही पाहायचे होते. धोंडगे प्रस्थापितांच्या विरोधात बाह्या सरसावून होते, पण समाज कोणत्याही कारणाने द्वेषपूर्ण गटागटात विभागला जावा असे त्यांना वाटत नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांचे इहलोकीचे वास्तव्य संपले असले तरी त्या सुतकातून दलित बाहेर पडले नव्हते.  धर्मांतरानंतरचा प्रभाव टिकून होता. आपल्या समाजाची निकड ओळखून राजा ढाले ह्यांनी त्यांना नेतृत्व दिले. एकटे पडू दिले नाही. धनगराने जीवावर उदार होऊन वाघापासून आपल्या मेंढरांचे रक्षण करावे तसे हे नेतृत्व होते. त्यांनी दलितांना गावकुसाबाहेरून महानगरातल्या राजस्त्यावर आणून दयेवर नव्हे तर सराईतपणे ताठ मानेने चालायला प्रवृत्त केले. बाबासाहेबांच्या ’मूकनायका’ला त्यांनी बोलते केले. ढाले ह्यांनी चालना दिल्यानंतर दलित जे आविष्कृत झाले ते मराठी वाङ्मयाचा एक भाग म्हणून सर्व समाज आपुलकीने वाचू लागला. समाजसुधारक आणि मराठमोळ्या रसवंतीचे राजराजेश्वर श्रीपाद महादेव माटे ह्यांनी आनंदाने वेडे व्हावे असे हे परिवर्तन होते. ढाल्यांना घाई होती. झटपट नवनिर्माण करायचे होते. म्हणून ते हातघाईवर आले. असभ्य भाषा वापरली, पण ते विकले गेले नाहीत. त्यांनी सुपारी घेतली नाही. आंबेडकर त्यांनी वाचला होता आणि ती बैठक त्यांचे सिंहासन होते. त्यांचा दुर्गा भागवतांशी कडाक्याचा वाद झाला. पु. भा. भाव्यांनी त्यांना ठोकून काढले, पण भारताचे तुकडे तुकडे व्हावे असे त्यांना वाटत नव्हते. भारतीय समाजाचा दलित हा समताधिष्टित, आत्मनिर्भर आणि प्रतिष्ठाप्राप्त भाग व्हावा हेच त्यांचे ईप्सित होते. मी वडाळ्याला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होतो तेव्हा मी जातीपातीच्या पलीकडे गेलो असल्याने हिंदुत्वनिष्ठ असलो तरी मला कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काळजी घेतली होती. परिवर्तनवादी  चळवळीच्या सर्व छटांच्या कार्यकर्त्यांनी ढाले ह्यांच्या कार्याचा पुनश्च नव्याने अभ्यास करायला हवा.

भास्करराव मुंडले बृहन्मुंबई महानगरपालिकेत अधिकारी होते आणि रा. स्व. संघाच्या मुंबई महानगराचे कार्यवाह होते. गृहस्थधर्माची कर्तव्ये व्यवस्थित पार पाडतानाही अनुशासित आणि समर्पित जीवनशैली त्यांना कवचकुंडलासारखी चिकटलेली होती. त्यांचे वर्तन स्नेहादरपूर्ण असे. म्हणून अल्पसूचनेनेही हजारोंचा मेळावा सुविहितपणे भरवता येईल असे अभूतपूर्व संघटन ते यांत्रिक मुंबईत बांधू शकले. मराठी माणूस वर्षानुवर्षे उपेक्षित आणि कंटकाकीर्ण मार्गावरून दमदारपणे चालत राहिला. कारण भास्करराव मुडल्यांसारखे शिक्षक त्याचे म्होरके होते. आणीबाणीत कारागृहात न अडकता बाहेर राहून जी गुप्त कामे उरकायची होती ती भास्करराव आणि अस्मादिक ह्यांनी जोडीने उरकायची असे लिहिले गेले होते आणि तसे छानपैकी झाले. ते मैत्रीला पक्के होते आणि संघात माझे जे मित्र होते त्यातले ते एक होते.

धोंडगे, मुंडले आणि ढाले ह्यांनी समाजाने सहोदर म्हणून संघटित आणि समरसतापूर्ण जीवन जगावे म्हणून स्वतः:स कष्टविले, पण करावयाचे बरेच बाकी आहे. दलित समाजाविषयीची आस्था आणि तिच्या सुरक्षित भवितव्याचा विचार ह्या विषयात सावरकर आणि आंबेडकर ह्यांची मते सारखी आहेत हे अजून आमच्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या ध्यानात यावयाचे आहे. दोघांच्या विचारसृष्टीत साम्यस्थळे पुष्कळ आहेत. मुसलमानांविषयीची दोघांची मते एकमेकांशी जुळणारी आहेत, पण मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत हे मानायला सावरकर सिद्ध होत नाहीत, तर आंबेडकर काही वेळा होतात हेही उमजायचे आहे. सावरकर, आंबेडकर आणि अनेक सुधारक हे अखंडता, एकसंधता आणि एकात्मता ह्यांचा पुरस्कार करणारे आहेत. त्यांचा तुकडे तुकडे करण्याला विरोध आहे. गोपाळबाबा वलंगकर हे दलितांमधील पहिले पत्रकार आणि विचारवंत. त्यांनी 1893मध्ये तेव्हाच्या व्हाइसरॉयला ’अस्पृश्यांचे प्रश्न’ अधोरेखित करणारे निवेदन सादर केले.  त्याचे प्रारूप न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ह्यांनी स्वहस्ते लिहिले होते. त्यावर स्वाक्षरी करणार्‍यांत बाबासाहेबांचे वडील भीमराव होते. महाराष्ट्राच्या थंड पडलेल्या गोळ्याला रानड्यांनी ऊब दिली आणि जिवंत केले, असे टिळकांनी त्यांच्यावरील मृत्युलेखात म्हटले आहे. ब्रिटिश शासनकाळात जे पहिले पदवीधर बाहेर पडले त्यातले एक माधवराव रानडे. समाजाचे रक्ताभिसरण आरोग्यपूर्ण व्हावे म्हणून त्यांनी अनेकानेक क्षेत्रात सेवाभावी संस्था कार्यान्वित केल्या. त्या सगळ्यांचा उद्देश एकसंध समाजनिर्मिती हा आहे. रानड्यांचे राजकारण जातीनिष्ठ नाही. ते ज्ञानाधिष्ठित आहे. आंबेडकर स्वतःला रानड्यांच्या परंपरेचे वारसदार मानतात. आंबेडकरांचा भर शिक्षणसंस्था काढण्यावर आहे.  दलितांनी सगळ्या समाजाचे वैचारिक नेतृत्व केले पाहिजे ही त्यांची मनीषा होती.  दुर्दैवाने आज त्यादृष्टीने काम ठप्प झाले असून पुन्हा ध्येयवादाने वेडे होऊन नव्याने धीरोदात्त वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. राजकीय कार्यकर्त्यांना संसदीय जीवनपद्धतीचे  परिपूर्ण शिक्षण मिळावे म्हणजे त्यांना सुसंवादाने प्रश्न सुटू शकतात हा विश्वास प्राप्त होईल असे आंबेडकरांना वाटत होते. तशी संस्था त्यांनी सुरूही केली होती. त्यांच्या निधनाने ती चालली नाही, पण बर्‍याच वर्षांनी संघ विचाराच्या लोकांनी सुरू केलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ती कसर काही अंशाने भरून काढली. आमचे आमदार आणि खासदार सेवाभावी हवेतच, पण ते ज्ञानसंपन्न आणि व्यावहारिक शहाणपण असलेलेही हवेत, म्हणजे ते लाचार आणि भ्रष्टाचारी होण्याची शक्यता कमी असते. धोंडगे, ढाले आणि मुंडले ह्यांनी मातीशी नाळ जुळलेला एकरस समाज निर्मिण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. त्या त्या वेळी ते वेगळे वाटले. आज ते एकाच शरीराचे अवयव वाटतात, असो.

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply