कर्जतच्या लोभेवाडी, ऐनाचीवाडीतील उच्चशिक्षित तरुणांचा उपक्रम
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी उच्च शिक्षित आदिवासी तरुणांनी लोभेवाडीमध्ये रात्रशाळेच्या धर्तीवर उपक्रम सुरू केला आहे.
सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र असे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. स्मार्टफोन नसल्याने आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहात आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट थांबू नये किंवा त्यात खंड पडू नये यासाठी लोभेवाडी गावातील उच्च शिक्षित तरुण मोतिराम भिका पादिर हे मदतीला आले आहेत. आदिवासी संघटनेचे तालुका सचिव असलेले पादिर हे कर्जत येथे श्रीराम फायनान्समध्ये दिवसभर काम करतात.त्यानंतर घरी येऊन रोज सांयकाळी आपल्या गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात.
या कार्याची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या पाथरज केंद्राचे प्रमुख बाळासाहेब पालवे, तसेच राष्ट्रीय सेवासंघ जनकल्याण समितीचे आनंद राऊळ, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक चवरे, उपशिक्षक दहिफळे यांनी लोभेवाडीमध्ये जाऊन रात्री घेतल्या जाणार्या शिकवणी वर्गाचे कौतुक केले. यावेळी पोलीस पाटील मारूती लोभी, तसेच काशिनाथ पादिर, सुनिल लोभी, काशा पादिर, काशिनाथ लोभी, जगन पादिर, अशोक लोभी, रघुनाथ पादिर, दामोदर लोभी, दत्ता लोभी, उत्तम पादिर, संजय पादिर, कृष्णा लोभी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
दिवसा शेती करून रात्री विद्यादान
कर्जत तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील ऐनाचीवाडी येथेही ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हते. वाडीमधील उच्च शिक्षित तरूण नयन विठ्ठल वाघ हे दररोज संध्याकाळी आपल्या गावातील विद्यार्थ्यांना आपल्या घरात बसून अभ्यास घेत आहेत. हा तरुण एमएपर्यंत शिकला असून नोकरी नसल्याने दिवसा शेतात कष्ट करतो आणि रात्री विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करतो.