पनवेल : वार्ताहर : भाडेतत्त्वावर तळोजा फेज वन येथील सेक्टर नऊ या ठिकाणी असलेल्या शिव कॉर्नर सोसायटीत राहणार्या उपाध्याय कुटुंबीयांतील चौघांचे मृतदेह शनिवारी (दि. 22) सकाळी बेडरूममध्ये आढळून आल्याने या इमारतीसह परिसरात खळबळ उडाली आहे. या चौघांनी आत्महत्या केली की त्यांचे आधी खून करून नंतर आत्महत्येचा बनाव करण्यात आला याचा शोध तळोजा पोलीस घेत आहेत. यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात भादंवि 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा फेज वन येथील सेक्टर नऊ या ठिकाणी असलेल्या शिव कॉर्नर सोसायटीच्या डी विंगमधील पाचव्या मजल्यावरील 502 हा ब्लॉक राजेश भारद्वाज या मूळ मालकांचा असून त्यांनी तो आठ महिन्यांपूर्वी नितीश कुमार उपाध्याय यांना भाड्याने दिला होता. या ब्लॉकचे नितीश कुमार उपाध्याय हे नियमित 5 ते 6 तारखेला भाडे देत असत, परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ब्लॉकचे भाडे त्यांना मिळाले नाही, तसेच त्यांनी केलेला फोनसुद्धा नितीश कुमार यांनी उचलला नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी मूळ मालक राजेश भारद्वाज हे या सोसायटीत आले व त्यांनी सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांना घेऊन ब्लॉकवर गेले. तेव्हा ब्लॉक आतून बंद आढळल्याने भारद्वाज यांच्याकडे असलेल्या दुसर्या चावीने उघडण्यात आला. सर्वकाही व्यवस्थित होते. कुठल्याही सामानाची उलथापालथ झाल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर ते सर्व बेडरूममध्ये गेले असता बेडरूमचा दरवाजा बंद आढळला. तो उघडला असता त्यांना कुबट वास आला. नितीश कुमार उपाध्याय (35)
यांचे फक्त मुंडके पंख्याला लटकताना आढळले व इतर मृतदेह खाली कुजलेल्या अवस्थेत होते. नायलॉन दोरी व इतर कपड्यांच्या सहाय्याने 30 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत व तिच्या बाजूला सात वर्षीय मुलगा व आठ वर्षीय मुलीचा मृतदेहसुद्धा अशाच पद्धतीने कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती तळोजा पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण व त्यांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी याबाबतची माहिती परिमंडळ-2चे उपायुक्त अशोक दुधे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना दिली. तातडीने सर्व अधिकारी घटनास्थळी पोहचून तपास सुरू झाला.
या व्यक्तीने प्रथम तिघांना जीवे ठार मारून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोटसुद्धा मिळाल्याचे समजते. त्याचप्रमाणे दोन महिन्यांचे थकीत भाडे 16 हजार रुपयेसुद्धा तेथे ठेवल्याचे समजते. यासंदर्भात पोलिसांनी प्राथमिक स्तरावर खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली, परंतु उपाध्याय कुटुंबीयांची पूर्ण नावे देण्यास पोलिसांनी सध्या तरी नकार दिला आहे.
3 जानेवारीपासून ही मुले शाळेत गेली नसल्याचे शाळेतून समजते. त्यामुळे ही घटना 3 तारखेपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांचा त्यादृष्टीने तपास सुरू आहे. घटनास्थळी इतर कागदपत्रांची, ब्लॉकचे अॅग्रीमेंट व इतर माहिती, मयत नितीश कुमार उपाध्याय यांचा मोबाइल फोन, सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज, बाजूच्या रहिवाशांकडून माहिती घेण्याचे काम सुरू असून ही व्यक्ती ट्रेडिंगचे काम करीत असल्याने त्यादृष्टीनेसुद्धा तपास सुरू आहे. अधिक माहितीमध्ये या व्यक्तीचे कोणीही नातेवाईक नसल्याचे समजते.