80 हजारांची सामग्री जळून खाक
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा-दिघी रस्त्यावरील कदम फर्निचर कारखान्याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत कारखान्यातील सुमारे 80 हजार किमतीचे लाकडी सामान जळून खाक झाले.
म्हसळा-दिघी रस्त्यावर नथुराम कदम यांचा विविध लाकडी वस्तू बनविण्याच्या कारखाना आहे. या कारखान्यात लाकडापासून लाटणी, पोळपाट, स्टूल, टी-पॉय, देव्हारे तसेच खुळखुळे, भोवरे, बॅटस, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या, खेळणी तयार करतात. शुक्रवारी (दि.6) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास या कारखान्यातून धूर येत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते नईम दळवी यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ इर्शादभाई तांबे, जुनेद खान, शरीफ काका, बाबू खान, सोनू अली, फैझान दामाद, आसिफ आली यांच्यासह शामराव कराडे, रावजी राठोड, कैलास होडशीळ, विक्रम सुंदर्डे व विजय फोकसे या पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या आगीत जोक्सो मशीन, पाच ग्रायंडर, लाकूड कटर, दोन प्लाय कटींग मशीन, ड्रील मशीन, खेळणी आणि कच्चामाल मिळून सुमारे 80हजार किमतीचे सामान जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कदम फर्निचर कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेची अद्यापही कोणीही तक्रार अगर फिर्याद न दिल्याने म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही.
-धनंजय पोरे, सहाय्यक निरिक्षक, म्हसळा पोलीस ठाणे