जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकेत सत्तांतर झाले असून, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. 77 वर्षीय बायडेन यांनी नवा इतिहास रचला. इच्छाशक्ती असेल तर वय आडवे येत नाही, हेही त्यांनी दाखवून दिले.
यंदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. राजकीय निवडणूक कुठेही असो वाद नसेल तर ती पूर्ण होत नाही. अमेरिकाही त्याला अपवाद ठरली नाही. प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक झालीच, शिवाय ऐन मतमोजणीदरम्यान उभय उमेदवारांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. या निवडणुकीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. अखेर ट्रम्प यांच्यावर बायडेन भारी पडले. बायडेन यांना 284, तर ट्रम्प यांना 214 इतकी मते मिळाली. अमेरिकेचे सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची आता नोंद झाली आहे. बायडेन यांच्या राजकीय काराकिर्दीची सुरुवात 48 वर्षांपूर्वी झाली. 1972मध्ये ते पहिल्यांदा अमेरिकन सिनेटसाठी निवडून गेले होते. तेव्हा सीनेटवर निवडून गेलेल्या सर्वांत कमी वयाच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला होता. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत बायडेन दोन वेळा उपराष्ट्राध्यक्ष होते. एकीकडे ट्रम्प हे बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जात, तर दुसरीकडे बायडेन यांचे बोलणे तोलूनमापून दिसते. वय व अनुभव यांचा मिलाफ त्यांच्या एकंदर कृतीत दिसतो. म्हणूनच विजयानंतर त्यांनी ‘मी राष्ट्रपती म्हणून ब्लू किंवा रेड स्टेट असे न पाहता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असे देशाकडे पाहिल’, असे म्हटले आहे. ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी, हा विजय ऐतिहासिक असल्याचे नमूद केले. 7.4 कोटींहून अधिक अमेरिकन लोकांनी मला मते दिली आहेत. आपल्या महान देशाचे नेतृत्व करण्यासाठी मला जनतेने निवडून दिले. हा माझा फार मोठा सन्मान आहे. पुढील काम अवघड जरुर आहे, पण मी आपल्याला वचन देतो की, मी संपूर्ण अमेरिकी जनतेचा राष्ट्रपती होईल. या निवडणुकीनंतर तणाव वाढू शकतो, मात्र आपल्याला शांतता राखायची आहे. कटू वक्तव्यांना मागे सोडत एकमेकांना पाहण्याचा, ऐकण्याचा हा काळ आहे, असे आवाहन जनतेला केले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतिपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची निवड झाली आहे. या दोघांचेही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून बायडेन आता नेतृत्व करतील. ते अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन यांनी भारतीय नेतृत्वासोबत चांगले संबंध जोपासले आहेत. याशिवाय बायडन यांचे भारतीय अमेरिकन्ससोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याचा फायदा भारताला होऊ शकतो. शिवाय भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची उपराष्ट्रपतिपदी झालेली निवडही भारतासाठी उपयुक्त ठरू शकते. भारताला शेजारी देश पाकिस्तान, चीन, नेपाळ यांचा उपद्रव अलिकडच्या काळात वाढू लागला आहे. अशा वेळी अमेरिका हा बलाढ्य देश पूर्णपणे आपल्या बाजूने उभा राहिल्यास शत्रू राष्ट्रांना आपोआपच जरब बसेल. आधीच भारतीय नेतृत्व, सैन्य अधिक मजबूत बनलेले असताना अमेरिकेतील निकाल आपल्या पथ्यावर पडणारा आहे.