मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत माहिती
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. तिथे वरिष्ठ नेत्यासह त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. 18 जून रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती या वेळी त्यांनी दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आषाढी एकादशीची पुजा झाल्यानंतर याबाबत लवकरच सांगण्यात येईल, मात्र अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 18 जून रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असाही कयास आहे. मुंबईत भेटून चर्चा करू आणि लवकरच या प्रश्नाचे उत्तर देऊ, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही आलो आहोत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सदिच्छा भेटी होत्या. हा राजकिय दौरा नाही. लोकांच्या मनात होते तसे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. भाजप- शिवसेना युतीचे जे सरकार अडीच वर्षांपूर्वी स्थापन व्हायला हवे ते आता आम्ही केले आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. पाच वर्षे ज्यांनी खूप चांगले काम केले, शेतकरी आणि लोकहिताचे काम केले ते मधल्या काळात खंडीत झाले. ते आम्ही पुन्हा पुढे नेणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीचेदेखील आवश्यक आहे. पंतप्रधान नरेद्र मोदींचे महाराष्ट्रासंबंधीचे व्हीजन समजून घेणार आहोत. केंद्राची मदत मिळाल्यानंतर राज्य वेगाने प्रगती करते, असेही त्यांनी नमूद केले.
खातेवाटपही तेव्हाच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघे आषाढी एकादशीची पुजा झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार असून खातेवाटप निश्चित करू.