Breaking News

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त- जनहित संवर्धक मंडळ, राजे शिवाजी प्रतिष्ठान, कच्छ युवक संघटना आणि रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 8) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 140 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कोरोना महामारीमुळे गेल्या सहा महिन्यांत मानवी जीवन जणू कोनाड्यात कुलूपबंद झाले होते. इच्छा असूनही सुविधेअभावी आणि जीविताच्या सुरक्षेच्या कारणाने रक्तदाते रक्तदान करू शकले नाहीत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत होता. परिणामी रुग्णांचा जीव कसा वाचवायचा हा यक्षप्रश्न डॉक्टरांपुढे उभा राहिला. आज देव मंदिरात सक्तीच्या बंदीत असताना संपूर्ण समाजासाठी डॉक्टर आणि हॉस्पिटल देवाच्या अवतारात रुग्णांची सेवा करीत आहेत. त्याच सेवेला आपलाही हातभार लागावा, खारीचा वाटा असावा या उद्देशाने नवीन पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला.
अमोल साखरे, उन्मेष लोहार, सतीश महाजन, आनंद जोशी, संजय पाटील, पंकज रुपारेल, हर्मेश तन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले. खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरच्या रक्तपेढीमार्फत रक्त संकलित करण्यात आले. या उपक्रमास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, परंतु कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत गर्दी होऊ नये यासाठी दुपारनंतर आलेल्या 15 रक्तदात्यांना रोटरी ब्लड बँकमध्ये रक्तदान करण्यासाठी पाठविण्यात आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply