पनवेल : बातमीदार
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. याचा फटका किराणा दुकानदारांना बसत लागलेला आहे. किराणा दुकानात माल शिल्लक नसल्याने ग्राहकांना परत जावे लागत आहे. किराणा दुकानातील माल मिळत नसल्याने किराणा दुकानदार देखील चिंतेत आहेत.
किराणा दुकान म्हटले की, यात दुकानात सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. लॉकडाऊनमुळे घाऊक बाजारात वस्तूंची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे काही वस्तूंचे भाव वाढून घेतले जात आहेत. त्यामुळे किराणा दुकानदार यांनादेखील ग्राहकांकडून अधिकचे पैसे घ्यावे लागत आहेत. बाजारात माल येत नसल्याने हवी ती वस्तू मिळत नाही. मालाची टंचाई लक्षात घेता होलसेल विक्रेत्यांनी किमती वाढवलेल्या आहेत. तर दुसरीकडे पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे किराणा दुकानदारांना सामान आणण्यासाठी बाजारात जाता येत नाही. त्यामुळे काहींनी आपली किराणा दुकाने बंद केली आहेत तर काहींच्या दुकानातील सामान संपत आले आहे.
बिस्कीट, चॉकलेट यांसारख्या वस्तू देखील संपत आलेल्या आहेत. त्यामुळे सामानाअभावी ग्राहकाला परत जावे लागत आहे. किराणा मालाचा तुटवडा जाणवू लागल्याने ग्राहक नाखूष आहे तर घाऊक विक्रेत्यांकडे माल नसल्याने त्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवलेली आहेत.
घाऊक बाजारात वस्तूंच्या किमती वाढवून घेतल्या जात आहेत. परिणामी वस्तूंची किंमत ग्राहकाकडून वाढवून घ्यावी लागते. त्यातच पोलिसांच्या नाकाबंदीमुळे पनवेलला जाता येत नाही, त्यामुळे दुकानात माल आणता येत नाही.
-एक दुकानदार