उरण : वार्ताहर
महाराजेस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्याच्या अनुषंगाने जासई मंडळात ग्रामपंचायत हॉल येथे गुरुवारी (दि. 9) चावडी वाचन व फेरफार अदालत उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या कार्यक्रमाला जासई परिसरातील 55 ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात 19 गावांचे चावडी वाचन करण्यात आले. तसेच मयत खातेदारांचा शोध घेऊन 39 मयत खातेदार शोधण्यात आले. त्याचप्रमाणे 36 फेरफार नोंदी मंजूर करण्यात आल्या. जासई पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींना महसूल संबंधित कामे करून घेणे याबाबत उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमणे महसूल विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना, राजीव गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना, वृद्धापकाळ निराधार योजना, अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, पंतप्रधान मानधन योजना पंतप्रधान सन्मान योजना आदी सर्व योजनांचे लाभ घेण्यासाठी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आवाहन केले आहे. या वेळी महसूल नायब तहसीलदार नरेश पेढवी, निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे, जासई ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व सर्व सभासद आदी उपस्थित होते.