Breaking News

कर्जतमध्ये भाजपचे आंदोलन; शेतकर्यांना राज्य सरकारची मदत न मिळाल्याने निषेध

कर्जत : बातमीदार

अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांची राज्यातील महाविकास आघाडी सरकारने थट्टा चालवली आहे. आजपर्यंत कर्जत तालुक्यातील कोणत्याही शेतकर्‍यांपर्यंत शासनाची मदत पोचलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत तहसीलदार कार्यालयाबाहेर अधिकार्‍यांना चुन्याची डबी आणि भाकरी देण्याचे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. भाजप किसान मोर्चाच्या माध्यमातून शुक्रवारी कर्जत तहसिल कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदारांना विविध आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार श्रीमती भास्कर यांनी हे निवेदन स्वीकारले. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या भातपिकांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांना कोणत्याही स्वरूपातील मदत मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे आवाहन केले आहे, मात्र इकडे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारातच आहे. पैसे हाताशी नाहीत, त्यामुळे ना गोड-धोड ना रोषणाई. शेतकर्‍यांसाठी ही दिवाळी, काळी दिवाळी आहे, असा आरोप तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे, जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, गायत्री परांजपे, जिल्हा परिषद गट अध्यक्ष संदीप म्हसकर, अंकुश मुने, नगरसेविका विशाखा जिनगरे  ज्येष्ठ कार्यकर्ते बिवलकर, नथुराम कराळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या आगळ्यावेगळ्या आंदोलनात सहभागी झाले होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply