पनवेल : रामप्रहर वृत्त
समूह संपादक मंदार दोंदे आणि विवेक पाटील संपादित सिटी बेल या इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 13) करण्यात आले. दिवाळीच्या शुभमुहूर्तापासून ‘सिटी बेल’चे इंग्रजी प्रकाशन वाचकांच्या सेवेत रुजू झाले आहे. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, विकासाच्या प्रक्रियेत आपल्या विभागात अमराठी नागरिकांचे वास्तव्य लक्षणीय पद्धतीने वाढले आहे. असे असले तरीही इथल्या माध्यमांची आणि त्यांची नाळ फारशी जुळली नाही. स्थानिक घडामोडी त्यांच्यापर्यंत घेऊन जाणारी अमराठी प्रसिद्धी माध्यमे कमी असणे हे त्यामागचे कारण असू शकते. ‘सिटी बेल’च्या येण्याने ही कमी भरून निघेल. त्यांनी या वृत्तसमुहाचे अभिनंदन करून दोंदे व पाटील यांना शुभेच्छा दिल्या. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की, सर्वसामान्यपणे दिवाळी अंक हे मराठीमध्ये प्रकाशित होत असतात, परंतु ‘सिटी बेल’ने प्रथमच इंग्रजी दिवाळी अंक प्रकाशित केल्याचे पाहून समाधान वाटते. नवी मुंबई महापालिकेपाठोपाठ पनवेल महापालिकादेखील झपाट्याने विकसित होत आहे. विकासाच्या या प्रवाहात आपल्यासोबत राहत असणार्या अमराठी बांधवांना स्थानिक घडामोडींबाबत अवगत करण्यासाठी या वृत्तपत्राचे आगमन फलदायी ठरेल. प्रकाशन सोहळ्याला दोंदे, पाटील यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पत्रकार संजय कदम, प्रसिद्धी प्रमुख हरेश साठे, मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी-फडकर आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर या दिग्गजांच्या परीस स्पर्शाने ‘सिटी बेल’च्या प्रथम अंकाचे प्रकाशन होणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अंक दिवाळीच्या मुहूर्तावर प्रकाशित होत असल्याने हा दुग्धशर्करा योग आहे. चांगली सुरुवात झाल्याने नक्कीच यश मिळेल असा विश्वास वाटतो.
-मंदार दोंदे