Breaking News

शटर डाऊनमुळे व्यापारीवर्ग संतापला

ठाकरे सरकारने फसवणूक केल्याची भावना

अलिबाग ः प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत, तर वीकेण्डला दोन दिवस लॉकडाऊन असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र रायगड जिल्ह्यात इतर दिवशीदेखील लॉकडाऊनसारखी अंमलबजावणी सुरू झाल्याने व्यापारीवर्ग संतापला आहे. ठाकरे सरकारने फसवणूक केल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व प्रकारची दुकाने व मॉल्स बंद ठेवण्यास सूचित करण्यात आले आहे. 30 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. यातून वैद्यकीय तसेच अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आधीच पहिल्या टाळेबंदीमुळे त्रस्त झालेल्या दुकानदारांनी मंगळवारी (दि. 6) सकाळी आपली दुकाने सुरू केली, पण काही तासांतच दुकाने बंद करण्यासाठी शासकीय कर्मचारी, पोलीस बाजारात फिरू लागले. त्यामुळे व्यापारी प्रचंड नाराज झाले. किमान सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी, असा सूर ऐकावयास मिळत होता. वीकेण्डची टाळेबंदी असताना उर्वरित दिवसांत दुकाने का बंद करायची, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
अशा पद्धतीने लॉकडाऊन लावणे योग्य नसल्याचे सांगून व्यापारीवर्गाने या लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. प्रशासनाने आतापर्यंत सांगितलेल्या सर्वच नियमांचे पालन आम्ही केले आहे व करीत आहोत, मात्र लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक संकट येईल. त्यामुळे शासन व प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर मद्याच्या दुकानांमध्ये चांगलीच गर्दी दिसून आली. अनेकांनी लॉकडाऊनमध्ये पुरेल इतका स्टॉक करून घेतला आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply