पनवेल : रामप्रहर वृत्त
साहित्याची आवड दिवाळी अंकांतून होते, याच साहित्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा पनवेल टाइम्स दिवाळी अंकाने जपली असल्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी मत व्यक्त केले.
या प्रकाशन समारंभ कार्यक्रमाला पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, ज्येष्ठ पत्रकार घनश्याम मानकामे, पत्रकार भालचंद्र जुमलेदार, विजय पवार, सुमंत नलावडे, लक्ष्मण ठाकूर आदी उपस्थित होते. यापुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, वर्षभरात दैनिक-साप्ताहिकातून सामाजिक बातम्या प्रसिद्ध होत असतात पण दिवाळी अंकातून ही वृत्तपत्रे साहित्याचा कानोसा घेतात. कोरोना महामारीच्या संकटातही दिवाळीची अंकांची परंपरा वृत्तपत्रांनी कायम राखली आहे. पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील विविध साहित्यिक, कवींना सहभागी करून घेतल्याने अंकात साहित्याची विविधता दिसून येते असे सांगितले.
पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी आपल्या प्रास्ताविकात, जग-देशातील वास्तव घडामोडींवरील साहित्य या दिवाळी अंकात प्रसिद्ध केले असून कोरोना संकटातही दिवाळी अंकांची परंपरा जपली असल्याचे सांगितले.