खालापूर ः प्रतिनिधी
दिवाळीचा सण आणि सलग सुट्यांमुळे पर्यटक फिरायला निघाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह सर्व प्रमुख रस्ते रविवारी (दि. 15) जाम झाले होते. एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर तर सकाळी 10 ते दुपारी 12च्या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार काही काळ टोल न घेता वाहने सोडण्यात आल्यावर येथील कोंडी कमी झाली. एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाका, जुन्या महामार्गावरील खोपोली-खालापूर अंतरावर आणि खोपोली-पेण रस्त्यावर पाली फाटा, खोपोली शीळफाटा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. एक्स्प्रेस वेमार्गे रायगड जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे, माथेरान, लोणावळा-खंडाळा आदी पर्यटनस्थळे परिसरात येण्यासाठी चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी उसळली. परिणामी एक्स्प्रेस वेच्या खालापूर टोलनाक्यावर दोन्ही बाजूने दोन-तीन किमीच्या रांगा लागल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. रविवारी दिवसभर एक्स्प्रेस वे आणि अन्य प्रमुख रस्त्यांवर वाहने वाढल्याने मार्ग हाऊसफुल्लच राहिले. दरम्यान, गेले अनेक दिवस पर्यटकांच्या प्रतीक्षेत असलेली रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आता पर्यटकांनी फुलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक लोक सुखावले आहेत.
जंजिरा किल्ला बंदच असल्याने हिरमोड
मुरूड ः रायगड जिल्हाधिकार्यांनी मुरूड येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला खुला केला असला तरी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची कार्यवाही पूर्ण न झाल्याने सध्या किल्ला बंद आहे. त्यामुळे पर्यटक नाराज होऊन माघारी जात आहेत. दिवाळीची सुटी असल्याने महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत, मात्र बोटींचे परवाने नूतनीकरण आणि प्रवासी विमा यांची तांत्रिक कारणांमुळे पूर्तता न झाल्याने प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे, तर दुसरीकडे पुरातत्त्व खात्याने किल्ल्यातील स्वच्छता तसेच ऑनलाइन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी केलेली नाही. मेरीटाइम बोर्ड आम्हाला ज्या वेळी लेखी कळवेल त्या वेळी आम्ही आमचे काम तातडीने सुरू, असे पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्यांनी सांगितले. सध्या तरी जलवाहतूक व किल्ला बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असल्याचे चित्र आहे.