पनवेल : रामप्रहर वृत्त
दीपावलीत लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र उत्साह तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळते. दिवाळी सणानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या किल्ल्यांची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका रूचिता लोंढे यांनी रविवारी (दि. 15) पाहणी करून स्पर्धकांचे कौतुक केले व त्यांना प्रमाणपत्र दिले. दीपावली म्हटली की संस्कृती, प्रकाशपर्व आणि एकूणच आनंदाचा सण. दिवाळीत किल्ले बनविण्याची परंपरा आहे. बच्चेकंपनी मोठ्या हौसेने किल्ले बनवित असते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका रूचिता लोंढे यांनी स्पर्धकांनी बनवलेल्या किल्ल्यांची माहिती घेतली व सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले. या वेळी भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, सदस्य अर्थव गुरव, नितेश घुगे आदी उपस्थित होते.