कर्जत : बातमीदार – माथेरानमध्ये पोलिसाकडून पत्रकारास मारहाण प्रकरणी पत्रकार आक्रमक घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास माथेरानमध्ये दमदाटी करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी मारहाण करणार्या पोलिसाविरोधात सर्व पत्रकार आक्रमक होऊन पोलीस ठाण्यात धडक देऊन पोलिसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
20 नोव्हेंबरला रात्री 11:30 च्या सुमारास माथेरान बाजार पेठ मधील बिलाल महाबळे यांना येथील पोलीस श्याम जाधव यांनी मध्यपान करून मारहाण केली. त्याबाबत बिलाल हे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता फिर्यादी बिलाल व पोलीस श्याम जाधव यांना वैद्यकीय तपासणीसाठी नगरपालिकेच्या बी. जे. रुग्णालयात नेत असताना याचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार दिनेश सुतार तिथे गेले असता सुतार यांना श्याम जाधव यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दमदाटी करत धक्काबुक्की करून मारहाण ही केली. ही बाब सकाळी रायगड प्रेस क्लबच्या सदस्यांना समजली. सर्व पत्रकार एकवटून दिनेश सुतार यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहून लेखी तक्रार माथेरानच्या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्याकडे केली आहे.
याअगोदर पोलीस श्याम जाधव यांच्यावर महिला पोलीस यांनी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती. तसेच श्याम जाधव यांच्या पत्नीनेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आता बिलाल महाबळे आणि दिनेश सुतार यांनी तक्रार दाखल केल्यामुळे याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असून वरिष्ठ यावर निर्णय घेऊ शकतात, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी सांगितले असून कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. असे ही ते म्हणाले. दरम्यान, बिलाल व दिनेश सुतार यांना मारहाण केल्याप्रकरणी माथेरान व्यापारी फेडरेशनने तीव्र शब्दात या घटनेचा निषेध नोंदवला आहे.