Breaking News

म्हसळ्यातील आदिवासी कुटुंबीयांना निवारा व स्वच्छता साहित्याचे वाटप

म्हसळा : प्रतिनिधी

दिल्लीस्थीत इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी आणि इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड या संस्थांनी निसर्ग चक्रीवादळ बाधीत म्हसळा तालुक्यातील आदिवासी कुटुंबियांना सुमारे पन्नास लाख रुपयांच्या निवारा व स्वच्छता साहित्याच्या संचाचे वाटप केले.

जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा म्हसळा तालुक्याला मोठा तडखा बसला. प्रामुख्याने जंगलाला लागून असलेल्या आदिवासी वाड्या-वस्त्या तसेच समुद्रालगतच्या कोळीवाड्यांतील घरांचे तसेच घरातील सामानांचे अतोनात नुकसान झाले होते. इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी आणि इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड या संस्थांतर्फे  म्हसळा तालुक्यातील आदिवासी कुटुंबियांना निवार्‍याच्या हेतूने दोन ताडपत्र्या, दोरखंड, दोन मच्छरदाण्या, बादली व मग, तसेच सहा अंघोळीचे साबण, धुण्याचा सोडा, पाणी निर्जंतुक करण्यासाठीच्या गोळ्या, पाच मास्क, एक सानिटायजर असे साहित्य असलेले संच पुरविण्यात आले होते. प्रत्येक संचात सुमारे चार हजार रुपयांचे सामान होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील कादवण वेरळ येथील शासकीय आश्रमशाळेचे कल्याण जाधव यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन सामर्थ्य संस्थेने सदर संचाचे म्हसळा तालुक्यातील एकूण 32 आदिवासी वाड्यांतील 1353 कुटुंबांना वाटप केले. ही मदत आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी कल्याण जाधव यांनी हरिश्चंद्र मांडवकर, महेश माने व तेजश्री रिकामे, एल. पी. खोत यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न केले.

तसेच फॅब इंडिया कंपनीने उच्च दर्जाचे मास्क विनामुल्य वाटप करण्यासाठी देऊ केले होते. म्हसळ्यातील  ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत, कृषी विभाग, वन विभाग तसेच सार्वजनिक वाचनालय आदी ठिकाणी या मास्कचे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयास दहा पीपीइ कीट देण्यात आले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply