पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल मधील समस्यांबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाना नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी पत्र देऊन लोकांचे हिताची व त्याचे जीवितावर बेतणारी कामे 15 डिसेंबर पुर्वी करावीत अन्यथा आपल्या नवीन पनवेल कार्यालयाविरुद्ध मोर्चा अथवा धरणे धरावे लागेल, असा इशारा देताना कोविड-19च्या महामारीच्या काळात त्याची पुर्ण जबाबदारी आपले कार्यालयाची व अधिकार्यांची राहील, असे ही कळविले आहे.
नवीन पनवेल येथे एमजीपी मार्फत सिडको पाणीपुरवठा करीत आहे. परंतु आज स्वत:चे मोर्बे धरण केवळ नवी मुंबईला आंदन देऊन उर्वरित पनवेल महानगरपालिका क्षेत्र व आजुबाजूची ग्रामीण विभाग तसेच इतर विभागास सुद्धा नियमित व सुरळीत करण्याची जबाबदारी एक विकासक म्हणून तुमची असतांना केवळ एमजेपी आणि एमएसइडीवर खापर फोडून आपले अधिकारी हात वर करतात तरी पाणी पुरवठा हा पनवेलवासीयांच्या अत्यंत गंभीर प्रश्न केवळ आपल्या अधिकार्यांच्या अकार्य क्षमतेमुळे निर्माण झालेला आहे. याचीही सोडवणूक आपण लवकरात लवकर करावी संपुर्ण नवीन पनवेलमधील 40 वर्षांपूर्वी टाकलेल्या पाइपलाइन संपूर्ण निकामी व कमी गेजच्या झालेल्या आहेत त्या सुद्धा नव्याने टाकाव्यात आणि जर पनवेल वासियांकडून पाणी प्रश्न पेटवले तर आपल्या अधिकार्यांना सिडको कार्यालयात बसणेही कठीण होईल व ह्याची वेळ आत्ता आलेली आहे.
नवीन पनवेलमधील सर्व गार्डन, रस्ते, स्ट्रीट लाईट याची निगा व दुरुस्ती करायची कामे आपल्या सिडको मार्फत करण्यात येतात. त्यांची निगा व दुरुस्ती करण्याचे काम व कर्तव्य हे सिडको म्हणून आपल्या कार्यालयाला टाळता येणार नाहीत. आपल्या नवीन पनवेल कार्यालयात वेळोवेळी विविध कामाबाबत प्रत्यक्ष भेटून व फोन द्वारे मी स्वत: अथवा माझे प्रतिनिधी यांनी तक्रार केली असता, केवळ थातूर मातुर उत्तरे दिली जातात. नवीन पनवेल गार्डनमधील धोकादायक मोठी व सुकलेली झाडे तोडणे आवश्यक असून सुद्धा आम्ही लोक प्रतिनिधी अथवा नागरिकांनी त्याबाबत वेळो वेळी पाठपुरावा देखील केला, परंतु त्याकडे सिडको अधिकारी स्वत:ची जबाबदारी ढकलून पनवेल महानगरपालिका अथवा ठेकेदारांवर टाकते परंतु प्रत्यक्ष कोण हे काम करते याची अधिकार्यांना सुद्धा स्पष्ट माहिती नाही.
नवीन पनवेल मधील सेक्टर 15 ए मधील भुजबळ गार्डन व सेक्टर 14 येथील कांडपिळे गार्डन येथील लाईट 3 जूनचे वादळापासून तुटलेल्या आहेत व बल्ब गेलेले आहेत ते सुद्धा वेळोवेळी तक्रार करून सुद्धा जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, व ते पूर्ववत केलेले नाहीत. तसेच सिडको कार्यालयाकडे स्ट्रीट लाईटची निगा व त्याची योग्यती पाहणी करण्यासाठी कोणी ठेकेदार, अधिकारी आहे कि नाही हे सांगणे कठीण आहे, कारण प्रत्येक वेळी आम्हा लोकप्रतीनिधींचाच त्याबाबत तक्रार व मागोवा घ्यावा लागत असतो व एवढे करून सुद्धा एक ते दोन महिने समस्या सोडविल्या जात नाहीत व अद्यापही हया समस्या सुटलेल्या नाहीत. माथेरान रोडचे दोन्ही बाजूस प्रचंड मोठे वृक्ष सुकून आज चार वर्षे झाली आहेत. या वृक्षांची सर्व खोडे तशीच ठेवुन दिलेली आहेत ती सर्व खोडे आता ऊन, वारा, पाऊसात कुजलेली आहेत व ती प्रचंड मोठी खोड जर कोणा जाणार्या व्यक्ती अगर समुहाचे अंगावर पडले तर जागेवरच जीवीत हानी होईल याची पुर्ण कल्पना असतांना सिडको अधिकारी मख्खपणे निर्विकारपणे हे सर्व पाहत बसतात, केवळ आर्थिक फायद्याची कामे करण्याकडे ल्यांचे लक्ष असते. परंतु, जनतेस आवश्यक व जीवितास धोका असलेली कामे करण्याचे टाळाटाळ करीत आहेत.
नवीन पनवेलमधील वरील विषयांबाबत योग्य त्या सिडको विभागास व अधिकार्यांना योग्य तो जाब विचारावा. लोकांचे हिताची व त्याचे जिवितावर बेतणारी ही सर्व कामे करून घेण्याबाबतचे आदेश 15 डिसेंबर पुर्वी करावीत अन्यथा आपले नवीन पनवेलचे कार्यालय विरुद्ध मोर्चा अथवा धरणे धरावे लागेल याची नोंद घ्यावी. तसेच अशी कृती आम्हास ह्या कोविड -19 चे महामारीचे काळात जर करावी लागली, तर त्याचीही पुर्ण जबाबदारी केवळ आपलेच कार्यालयाची व अधिकार्यांची राहील. हा सध्या आपणास इशारा आहे, यापुढे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी व रहिवाशी एकत्रीत येवून ह्याबाबत योग्य ती कृती नक्कीच करू याचीही नोंद घ्यावी असा सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाना पत्र पाठवून इशारा दिला आहे.