महाड : प्रतिनिधी
एसटीच्या महाड आगाराच्या ताफ्यात आणखी एक सुविधा प्राप्त झाली आहे. नुकताच आगारात दुरुस्ती पथक वाहन दाखल झाले आहे. त्यामुळे एसटी बस कुठेही बंद पडली तर तत्काळ त्याठिकाणी हे दुरुस्ती पथक वाहन दाखल होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड एसटी आगारात दाखल झालेल्या या दुरुस्ती पथक वाहन (ब्रेक डाऊन वाहन)मध्ये दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री, कॉम्प्रेसर, क्रेन आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे ग्रामीण किंवा महामार्गावर कुठेही एसटीची बस बंद पडली तर तत्काळ हे वाहन घटनास्थळी जाऊन त्याच ठिकाणी बंद एसटी बसची तत्काळ दुरुस्ती करणार आहे. या दुरुस्ती पथकामुळे एसटीची बस वाटेत बंद पडल्यानंतर प्रवाशांना दुसर्या वाहनाची वाट पाहत ताटकळत बसणे आता बंद होणार आहे.