Breaking News

मालमत्ता कर थकवल्याने सदनिका, टॉवर सील

कर्जत नगर परिषदेची धडक कारवाई

कर्जत : प्रतिनिधी

नगर परिषद हद्दीतील थकीत मालमत्ता कर 31 मार्च अगोदर जमा करा अशी लेखी सूचना तसेच ध्वनिक्षेपकामार्फत जाहिरात करूनसुद्धा काही नागरिकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने कर्जत नगर परिषदेच्या कर विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तीन सदनिका व दोन मोबाईल टॉवर सील करण्यात आले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीपासून आर्थिक उत्पन्न मिळते. शासनाकडून शंभर टक्के करवसुलीचे आदेश आहेत, कर्जत नगर परिषद नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करीत आहे. मात्र थकीत मालमत्ता कर भरण्याबाबत नोटीस देऊनही काहीजण कर भरण्यास उदासीनता दाखवत आहेत. अशा कर चुकविणार्‍यावर नगर परिषद प्रशासनाने धडक कारवाई केली आहे.

दहिवली ब्राम्हण आळीमधील नरसिंह अपार्टमेंटमधील मंगल प्रफुल प्रधान यांनी सन 2008 मध्ये आठ फ्लॅट एलआयसी हौसिंग फायन्सस यांना विकले होते. मात्र त्यांनी अद्याप नगर परिषद प्रशासनासकडे कोणताही कर भरला नाही. सुमारे चार लाख 17 हजार 440 रुपये कर न भरल्याने नगर परिषद प्रशासनाने या आठपैकी व तीन फ्लॅट सील केले आहेत.

नगर परिषद हद्दीत अनेक इमारतींवर नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे टॉवर उभे आहेत. त्या टॉवरच्या माध्यमातून बिल्डिंगला मोठ्या प्रमाणात भाडे मिळत आहे. मात्र हे टॉवर कर भरत नसल्याने नगर परिषद प्रशासनाने त्यांच्यावर धडक कारवाई केली आहे.

कर्जत बाजारपेठेतील धर्मराज पॅलेस या इमारतीवर टाटा टेली सर्व्हिस कंपनीचा टॉवर असून, त्याची तीन लाख चार हजार 722 रुपये तर धापया मंदिरासमोरील साईराज इमारतीवर श्री क्योपो टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा टॉवर असून त्याची दोन लाख 53 हजार 822 रुपये थकबाकी असल्याने मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या आदेशानुसार कर अधीक्षक सुरेश खैरे, कर निरीक्षक सचिन सोनावणे, नगर अभियंता मनीष गायकवाड, नगररचनाकार लक्ष्मण माने, लिपिक रवींद्र लाड, बापू बेहराम, निलेश फाळे, रुपेश पाटील, बाळा निकाळजे या टीमने हे टॉवर सील केले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply