नागोठणे : प्रतिनिधी
रिलायन्स व्यवस्थापन आणि लोकशासन संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली असून, मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. दरम्यान येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी 27नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने मागील शुक्रवारपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात आले आहे. बुधवारी (दि. 2) दुपारनंतर कंपनीचे व्यवस्थापन आणि संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात कंपनीच्या मटेरियल बिल्डिंगमध्ये चर्चा झाली. व्यवस्थापनाच्या वतीने विनय किर्लोस्कर, उदय दिवेकर, रमेश धनावडे, तर लोकशासनच्या वतीने स्थानिक पदाधिकारी शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, उषा बडे, सुरेश कोकाटे, नीता बडे, गुलाब शेलार तसेच रोह्याचे डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे या चर्चेत सहभागी झाले होते. आंदोलन करून प्रश्न सुटत नसल्याने आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती व्यवस्थापनाकडून करण्यात आली. तर 13 नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले तेव्हा कंपनीच्या एका अधिकार्याने 27 नोव्हेंबरला चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, ते आजपर्यंत पूर्ण केले नसल्याने आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे संघटनेकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कंपनी जोपर्यंत सकारात्मक चर्चा करीत नाही, तोपर्यंत येथून उठणारच नसल्याचा निर्धार संघटनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, विभागातील पिगोंडेचे सरपंच संतोष कोळी, उदय जवके, कडसुरेचे सरपंच राजेंद्र शिंदे, झोतीरपाडाचे सरपंच दत्ता तरे यांनी बुधवारी सायंकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.