Breaking News

नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

दिवाळीनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत आता घट होत असल्याचे नवी मुंबईत पहावयास मिळत आहे. ही घट दिलासादायक असली तरी कोरोना अद्याप पूर्ण गेलेला नाही. रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होत असले तरी नियमांचे पालन व काळजी घेणे गरजेचे आहे. तीन महिन्यांपूर्वी 19.23 वर असलेला कोरोनाबाधित होण्याचा दर आता 12.49 वर आला आहे.

नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या 48 हजार 366  झाली आहे तर आतापर्यंत 986 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या नवी मुंबईत 3500च्यावर पोहचली होती. दिवाळीत ही संख्या 1200 च्या जवळपास होती त्यात वाढ होत आता 1500 इतके रुग्ण उपचार घेत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी, बाहेरगावी फिरण्यासाठी गेलेल्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे बाधितांची संख्या वाढली. नियंत्रणात आलेली परिस्थिती बिघडत असल्याने पालिका प्रशासनाने दिवाळीनंतर दरदिवशी चार हजार कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. यातून सरासरी पहिल्या पंधरा दिवसांत 128 रुग्ण सापडत होते. दिवाळीपूर्वीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत वाढ झाली असली तरी दिवाळीपूर्वी फक्त तीन हजार 200 इतक्याच चाचण्या करण्यात येत होत्या. चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्येतही वाढ झालेली दिसत आहे. 20 नोव्हेंबरला पाच हजार 61 तर 24 नोव्हेंबरला पाच हजार 84 इतक्या सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर सरासरी गेल्या पंधरा दिवसात चार हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्येत वाढ दिसत आहे.

दिवाळीनंतरचे भीतीदायक वातावरण आता हळूहळू निवळेल अशी आशा पालिका प्रशासन व्यक्त करीत आहे. नवी मुंबईत कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1500च्या जवळपास आहे. दिवाळीनंतर सोमवारी प्रथमच नवे रुग्ण 100 तर मंगळवारी 115 इतके होते. दिवाळीनंतरचा महत्त्वाचा 15 दिवसांचा कालावधी संपला असून आता यापुढील पंधरा दिवसांत नव्या रुग्णांची स्थिती काय असेल यावर शहरातील कोरोनाबाबतची परिस्थिती अवलंबून असणार आहे. त्यावर आरोग्य उपाययोजनांचे नियोजन अवलंबून असून बंद करण्यात आलेली कोरोना काळजी केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

दिवाळीनंतर नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. परंतु कोरोनाबाधित होण्याचा दर सातत्याने खाली आला आहे. सप्टेंबरमध्ये असलेल्या दरापेक्षा 30 नोव्हेंबरचा दर हा सात टक्क्यांनी कमी आला आहे. त्यामुळे पालिका कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत असून त्याला नागरिकांचे सहकार्य हवे. नवी मुंबईकर नागरिकांची कोरोना नियमावली पाळण्यासाठी अधिक साथ हवी आहे, असे नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply