Friday , September 22 2023

महाविकास आघाडीला धक्का

धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी

धुळे : प्रतिनिधी
धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पटेल यांना 332, तर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढलेले काँग्रेसचे अभिजित पाटील यांना अवघी 98 मते मिळाली.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अमरीश पटेल तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा या निवडणुकीत भाजपला फायदा होणार की महाविकास आघाडी सरकारला फायदा होणार याकडे लक्ष लागून होते. अखेर भाजपमध्ये गेलेल्या पटेल यांची एकहाती विजय मिळविला.
आघाडीची मते फुटली
या निवडणुकीत 437 पैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये आघाडीच्या 213 आणि भाजपच्या 199 मतदारांचा समावेश होता. यापैकी चार मते बाद झाली. 216 प्रथम प्राधान्याची मते घेणारा उमेदवार जिंकणार असे गणित होते. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी 332 मते घेत काँग्रेसचे अभिजित पाटील यांच्यावर विजय मिळवला. महाआघाडीची 115 मते फुटली. विशेषत: काँग्रेसच्या 50हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले असल्याचे दिसून येत आहे.
खडसे सलामीलाच गारद
माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर हख पहिली निवडणूक होती. खडसेंनी पक्षप्रवेशावेळी भाजपविरोधात मोठी गर्जना केली होती, मात्र खडसेंना महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यात यश आले नाही. पक्षांतरानंतर पहिल्याच निवडणुकीत भाजपने त्यांना धोबीपछाड दिली आहे.

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडी आपली 50 टक्केही मते राखू शकली नाहीत. यावरून उद्याचे महाविकास आघाडीचे काय भविष्य राहील हे स्पष्ट होते. अमरीश पटेल तसेच सर्व मतदारांचे त्रिवार अभिनंदन!
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply